Friday, December 5, 2014

Wedding Banquet Dinner

लग्नातली मेजवानी Wedding Banquet

तुळशीच्या लग्नापासून सुरू झालेला लग्नसराईचा हंगाम आता ऐन झोकात आलाय. डिसेंबरमध्ये लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त आहेत. लग्नाच्या तयारीत कपडे, दागिने, हॉल, सजावट या गोष्टी येत असल्या तरीही एक महत्त्वाची गोष्टही त्यात असते. मेन्यू ठरवणे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांच्या लक्षात राहणारी आणि मनापासून खूश करणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे जेवण. लग्नाची मेजवानी हा म्हणूनच खासा विषय. मराठमोळ्या लग्नात चाखायला मिळणारे पदार्थ म्हणजे जिलबी, गुलाबजाम, मसालेभात, पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड बस, इतकंच! पण आता जमाना बदलला आहे. मराठी लग्नांमध्ये परप्रांतीय पदार्थानी कधीच एंट्री मारली आहे. पंजाबी पदार्थ तर हल्ली लग्नाच्या मेन्यूमध्ये 'मस्ट' झाले आहेत.
भन्नाट कॉम्बिनेशन्स
सध्याच्या सीझनमध्ये कोणता मेन्यू लोकप्रिय आहे, याची माहिती काढण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पुण्याच्या मंगल कार्यालयांमध्ये आणि केटरिंग सव्‍‌र्हिसेसमध्ये चौकशी केल्यावर पक्वान्नांपेक्षा 'डेझर्ट' म्हणजे जेवणानंतर खाता येणाऱ्या पदार्थाचा भाव वधारला असल्याचं सांगण्यात आलं. गोडाच्या पदार्थामध्येही गाजरहलवा, अंगुर मलई, सीताफळ रबडी, मालपोवा हे पदार्थच कॉमन झाले आहेत, अशी माहिती मिळाली. आइस्क्रीमला अनेकजणांची पसंती असते. जिलबी आणि रबडी, गरम गुलाबजाम, गाजरहलवा आणि आइस्क्रीम, मालपोवा आणि रबडी अशी भन्नाट कॉम्बिनेशन्स चलतीत आहेत.
वेडिंग केकचा ट्रेंड
वेडिंग केक हा सध्याचा लेटेस्ट ट्रेंड आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये खरं तर असा वेडिंग केक पारंपरिक मानला जातो. किमान दोन-तीन लेअरचा मोठा केक नवपरिणित जोडप्यानं एकत्र कापायचा आणि त्याचा आस्वाद पाहुणे मंडळींनी घ्यायचा, अशी प्रथा. आता तरुणाईचं केकप्रेम वाढल्यामुळे मराठी लग्नांमध्येदेखील आवर्जून वेडिंग केक कापला जातो. पारंपरिक वेडिंग केक व्हाइट आयसिंगचा फ्रुट केक असतो. हल्ली आपल्याकडे मात्र रंगीबेरंगी, आवडीनुसार हव्या त्या फ्लेवरचा असतो.
ट्रॅडिशनल वेडिंग केक रेसिपी
पारंपरिक वेडिंग केक पांढऱ्या रंगाचा असतो आणि तो किमान दोन-तीन लेअरचा असावा लागतो. किमान सहा इंच व्यासाचा सगळ्यात वरचा थर असावा. त्याखाली नऊ आणि बारा इंचाचे तीन केक करून एकावर एक सजवता येतील. १९ व्या शतकात वेडिंग केकची सोप्या रेसिपीचा मंत्र १, २, ३, ४ असा सांगितला जायचा. म्हणजे १ कप बटर, २ कप साखर, ३ कप मैदा आणि ४ अंडी. तुम्हाला हवी ती आणि हव्या त्या प्रमाणात ड्राय फ्रूट्स घालून आणि व्हाईट आयसिंगनी सजवून असा दुहेरी वेडिंग केक तयार करता येईल.
बेसिक लेअरचं साहित्य : ३ कप चाळून घेतलेला मैदा, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा टी स्पून मीठ, १ कप लोणी, २ कप साखर, ४ अंडी, १ कप दूध, एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : लोणी फेटून घ्या, त्यात साखर घालून पुन्हा फेटा, अंडय़ाचा पिवळा बलक वेगळा काढून एकेक मिक्स करत फेटून घ्या. इसेन्स आणि ड्रायफ्रूट्स आणि इतर साहित्य घाला. नंतर चाळलेला मैदा, बेकिंग पावडर घालून मिक्स करा. शेवटी अंडय़ाचा पांढरा भाग वेगळा फेटून तो मिक्स करा. हे मिश्रण दोन लहान- मोठय़ा गोल बेकिंग ट्रे मध्ये काढून सारखं करून प्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये बेक करा.
दोन केक बाहेर काढून वेगवेगळं व्हाईट आइसिंग करा. एकावर एक सावकाश ठेवून आइसिंगचा शेवटचा हात फिरवा. आइसिंगची गुलाबाची फुलं, रिबीनी, चेरी, फ्रूट्स यांनी सजवा. वेडिंग केक तयार.

No comments:

Post a Comment