फॅशन पॅशन : बी कॉन्फिडन्ट, बी पॉझिटिव्ह

मी माधुरी, मी २४ वर्षांची असून माझी उंची ५ फूट ७ इंच व वजन ५२ किलो आहे. वर्ण गव्हाळ आहे. मी मध्यमवर्गीय घरात वाढले. तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतेय. सोबतच दोन महिन्यांपासून एके ठिकाणी जॉबपण करतेय. मी पंजाबी ड्रेस घालते. पण इतर मुलींकडे पाहिलं की वाटतं मी फार गबाळी आहे. कोणालाच मी आवडत नाही असं वाटतं. मला साधंच पण चालू काळाप्रमाणे थोडंफार प्रमाणात स्टायलीश राहायला आवडतं. माझ्यासाठी कुठली स्टाइल चांगली दिसेल?    - माधुरी पोवार
हाय माधुरी,
एकंदरीत वर्णनावरून तू अंगाने बारीक असावीस असे दिसते, त्यामुळे तुला कोणत्याही स्टाइलचे कपडे सूट करतील हे मी खात्रीने सांगू शकते. तुझी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू आहे म्हणजे लवकरच तुला एखाद्या चांगल्या नोकरीची संधीही मिळेल, शिवाय तू आताही नोकरी करत आहेसच तेव्हा प्रत्यक्ष 'वर्क कल्चर' कसं असतं याची तुला कल्पना येईल. स्कर्ट्स वगरे सारखे स्टायलिश कपडे घालण्याची तुला सवय नाही हे मी समजू शकते, पण खरं सांगू का, स्टायलिश दिसण्यासाठी या अशा कपडय़ांची मुळीच गरज नसते. मी नेहमी सांगत असते की स्टायलिश दिसण्यासाठी तुमचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुम्ही स्वत:ला कसे कॅरी करता या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या अवतीभवती दाखल होणाऱ्या लेटेस्ट फॅशन्सवर लक्ष ठेव, त्यातून तुला सूट होणारी स्टाइल सापडू शकेल. जर तुला एखादा विशिष्ट लुक आवडत असेल तर तसा लुक देण्यासाठी, लेटेस्ट स्टाइल्सचा वापर करून नवीन प्रयोग करू शकतेस.
आता आपण कपडय़ांच्या देसी स्टाइल्सबद्दल बोलू या, तुझ्या मते सलवार कमीजमध्ये तुझा लुक डल वाटतो. पण बिलिव्ह मी, सलवार कमीजमध्येही आपण स्टायलिश दिसू शकतो, कारण मुळात आपण कोणते कपडे घालतो हे महत्त्वाचं नसून, ते कसं घालतो हे महत्त्वाचं आहे. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना मी नेहमीच सुचवत असते की सर्वात प्रथम आपल्या शहरातील लेटेस्ट फॅशन ट्रेंड्सवर सतत नजर ठेवा, तुम्हा तरुण मुला-मुलींना ते सहज जमेल, बाजारात आलेल्या नवनवीन स्टाइल्सच्या कपडय़ांवर लक्ष ठेवा. फॅशनबद्दलची माहिती देणारी मासिके वरचेवर चाळत राहा, या सर्वासाठी आपल्या गुडफ्रेंडचा म्हणजे इंटरनेटचा आधार घ्या, एकदा का तुझ्या वयाच्या मुलींमध्ये कोणत्या ड्रेसस्टाइलची चालती आहे याचा अंदाज तुला आला, की मग काहीच कठीण नाही.
अर्थात तू नोकरी करणारी युवती आहेस, हे लक्षात घेऊन तुझ्या कामाच्या ठिकाणी ड्रेसकोडसंबंधी काही संकेत असतील तर त्यांचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी करायच्या ड्रेसिंग स्टाइल्ससाठी सर्वसाधारण नियम म्हणजे फार भडक रंगांचे किंवा अती झगमगीत कपडे घालू नयेत. तसंच शरीराचं प्रदर्शन करणारे, किंवा तंग (बॉडीहिगग) कपडेही हमखास टाळावे. उदाहरणार्थ खोल गळ्याचे, हॉल्टर नेक प्रकारचे टॉप्स, कुर्तीज, झिरझिरीत (पारदर्शक) किंवा भरजरी कापडाचे ड्रेसेस, असे कपडे कामाच्या ठिकाणी मुळीच शोभून दिसत नाहीत.
तुला कुर्तीज विथ लेगिंग्स आवडतील का? तर मग सध्या इन असलेली पिंट्रेड लेगिंग्स विथ प्लेन कुर्ता ही स्टाइल तू करून बघ. खरं तर फार छान छान प्रकारचे टय़ुनिक्स पॅटर्न्‍स आजकाल मुली घालताना दिसतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फार साध्या, छोटय़ा बदलांमुळेही आपण स्टायलिश दिसू शकतो. हल्ली जॉर्जेट, शिफॉन या कापडांचे ड्रेसेस इन आहेत. 'अनारकली' ड्रेस प्रकारही अजून आवडीने घातला जातो अर्थात रोजच्या वापरासाठी नाही पण सण, समारंभातून तो चांगलाच उठून दिसतो. तू टीव्हीवरील मराठी मालिका बघतेस का? त्यातून बहुतेकदा मध्यमवर्गीय, साधे राहणीमान प्रदíशत होत असते. या मालिकांतील नायिकांच्या ड्रेस स्टाइल्स आपण ट्राय करू शकतो. मला वाटतं 'होणार सून मी..' मधल्या जान्हवीची राहाणी तुझ्याशी मिळतीजुळती आहे. तिचा लुक साध्या, सुध्या सलवार कमीजमध्येही किती छान दिसतो. साधेच ड्रेस, पण ते कॅरी करायची 'जान्हवी'ची स्टाइल लक्षात घ्यायला हवी.
आता आपण वेस्टर्न आऊटफिट्सबद्दल विचार करूया. खाली पिंट्रेड आणि वर प्लेन हाच ट्रेंड या कपडय़ांमध्येही सध्या इन आहे. पिंट्रेड पँट किंवा जीन्स आणि प्लेन टॉप/ शर्ट. सध्या मऊ सुती (सॉफ्ट कॉटन) कापडाच्या पॅन्टची फॅशन आहे. ज्यांचे हिप्स आणि मांडय़ांकडचा भाग बारीक असेल त्यांना हा प्रकार शोभून दिसतो. सध्या चलती असलेला आणखी एक प्रकार म्हणजे पलाझ्झो पँट. स्टायलिश दिसणाऱ्या पलाझ्झो, शॉर्ट किंवा हिप लेन्थ असलेल्या टॉप्सवरही चांगल्या दिसतात. डय़ुनिक स्टाइलमधील टॉप्स ही आजकाल पाहायला मिळतात. कपडय़ांचा पूर्ण वेस्टर्न लुक तुला आवडत नसेल तर हे टय़ुनिक स्टाइल टॉप्स, आर जस्ट फॉर यू!
आता वेस्टर्न आऊटफिटमध्ये फॉर्मल ड्रेस स्टाइल हवी असेल तर प्लीटेड कॉटन ट्राऊझर उत्तम, त्यावर साधा किंवा कॉलर्ड शर्ट घालता येईल आणि वर नाजूक पिंट्रचा स्कार्फ घेतला की झालं. या ट्राऊझर्स स्ट्रेट किंवा टेपिरग (पायाकडे निमुळते) बॉटम्सच्या हव्यात,  कारण घेरदार बॉटमची (बूट कट्स) एकेकाळी फॅशन आली होती पण ती सर्व वयोगटाच्या स्त्रियांसाठी योग्य नसल्याने फारशी लोकप्रिय झाली नाही. तेव्हा पलाझ्झो पँटमध्ये घेराचा वापर होतो तेव्हढाच पुरे. तुझा ड्रेस साधा असेल तर त्यावर ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीज घाल, त्यामुळे स्टायलिश लुक येईल.
आतापर्यंत आपण स्टायिलगसाठी कापड, कट्स आणि इतर गोष्टींवर विचार केला. आता आपण रंगसंगतीबद्दल बोलू या, तू सांगितल्याप्रमाणे तुझा वर्ण गव्हाळ आहे. त्यामुळे  काळा, ब्राऊन, ग्रे, नेव्ही ब्ल्यू, रॉयल ब्ल्यू (ऑलिव्ह, इंग्लिश, लीफ) ग्रीन, हलका पिवळा, हलका केशरी, गुलाबी, रस्ट, टोमॅटोसारखा लाल. क्रिमसन, मरून, पांढरा आणि त्याच्या सर्व छटा, बेज, विटकरी लाल म्हणजे जवळपास सर्वच रंगांतील ड्रेसेस तुझ्यावर उठून दिसतील. याशिवाय लेटेस्ट स्टाइलचा छानसा हेअरकट, मेकअपच्या बेसिक गोष्टी - काजळ, लिपग्लॉस यांचा वापर सुरू कर आणि बघ तुझा लुक पार बदलून जाईल. 
माधुरी,  कपडे, अ‍ॅक्सेसरीज सगळं काही विकत घेता येईल, पण स्टायलिश दिसण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास मात्र तुझा तुलाच मिळवावा लागेल. स्टायिलगच्या सगळ्या टिप्स मी तुला देऊ शकते पण तू तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नकोस. स्वत: वर प्रेम कर, विश्वास ठेव. 'आपण कोणाला आवडत नाही' हा गंड मनातून काढून टाक. स्वत: ला कमी लेखू नकोस. स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी कधीच करू नकोस. तुझ्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थानं ओळख आणि त्यांचा विकास कर, त्यानेच तुझा आत्मविश्वास वाढेल. बी पॉझिटिव्ह. एक काम कर, रोज सकाळी झोपून उठल्यावर आरशात पाहून म्हण 'आय एम द बेस्ट'. बघ तुझ्या विचारसरणीत हळूहळू बदल घडेल आणि अर्थात तुझ्या लुकमध्येही. तुझ्यातील स्मार्ट बदलासाठी, आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा!

No comments:

Post a Comment