शुभमंगल सावधान
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग. काही गोड तर काही कटु आठवणी असलेला सोहळा. आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मनात पुन्हा एकदा ४० वर्षांपूर्वीच्या आठवणींनी गर्दी केली.
तसं आमचं लग्न माझ्या दृष्टीने ऐतिहासिकच
होतं. ४० वर्षांपूर्वी मित्राच्या लग्नात ह्यांंनी मला पाहिलं आणि पसंत
केलं. माझ्या घरून लग्नाला विरोध नव्हता. पण, हे लग्न दोन्ही घरच्या
वडीलधार्यांच्या संमतीनं व्हावं, एवढीच एक इच्छा होती. पण, इथेच आमच्या
प्रेमाची खरी परीक्षा होती. ह्यांंचे वडील गावातील मान्यवर व्यक्तींपैकी एक
होते. मी म्हणजे नवरी मुलगी शहरातील असल्यामुळे प्रथम नकारापासूनच सुरुवात
झाली. पण, बर्याच वादावादीनंतर लग्न ह्यांंच्या गावी म्हणजे तळेगावलाच
आणि यांच्याच पद्धतीने व्हावे, या अटीवर आमचं लग्न ठरलं. महिनाभरानंतरचा
मुहूर्त ठरला.
पाहता पाहता लग्नासाठी गावी जायची वेळ
आली. मला प्रचंड दडपण आलं होतं. लग्नाच्या दोन दिवस आधी आम्ही तळेगावसाठी
निघालो. देवगावला उतरून तिथून बैलबंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
बैलबंडीत प्रथमच बसत असल्यामुळे मी फारच आनंदात होते. पण, बैलबंडीत बसून
तळेगावला पोचेस्तोवर मात्र आनंदाची जागा हाडं तुटतात की काय, या काळजीने
घेतली! गावाच्या वेशीवर सनई-चौघडे वाजवून आमचं जंगी स्वागत केलं गेलं. मला
म्हणजे शहरातील नवर्या मुलीला बघण्याकरिता रस्त्यावर बघ्यांची बरीच गर्दी
उसळली होती. आम्हा वर्हाड्यांची व्यवस्था नदीकाठी असलेल्या जिल्हा
परिषदेच्या शाळेत करण्यात आली होती. व्यवस्था उत्तम असल्यामुळे आणि
आजूबाजूचा परिसर रमणीय असल्यामुळे जरा दडपण कमी होऊ लागले. खरी परीक्षा
सुरू झाली ती सकाळी. प्रात:र्विधीसाठी आम्हा शहरी वर्हाड्यांसाठी खास सीट
असलेल्या तट्ट्याच्या शौचालयाची व्यवस्था केली होती. आत गेले तर बाहेर मला
बघायला येणारी मंडळी अगदी स्पष्ट दिसत होती. घाबरलेली मी लगेच बाहेर आले.
मला पाहताच बाहेर उभी असलेली मंडळी तोंडावर हात धरून हसू लागली. आमची
व्यवस्था बघणार्या एका बाईंना मी माझी अडचण सांगितली, तर त्यांनी हसत हसत
मला, विटांच्या भिंती असलेलं शौचालय दाखवलं. आत गेले आणि खुड्डीचा संडास
बघून त्यापेक्षा तट्ट्याचाच बरा म्हणत मी परत आले.
आमचं लग्न गावात असलेल्या दत्ताच्या
देवळात लागणार होतं. लग्नासाठी मी तयार झाले. आम्हाला देवळात घेऊन
जाण्यासाठी शाळेबाहेर पुन्हा एकदा सजवलेल्या बैलबंड्या तयार होत्या. त्या
बघून तर माझ्या पोटात भीतीचा गोळाच उठला. वाटलं जाऊच नये, पण दुसरा पर्याय
नसल्यामुळे मला बैलबंडीतच बसावं लागलं. लग्नघटिका जवळ येताच आम्हाला,
देवळात तयार केलेल्या बोहोेल्यावर उभं केलं. लाऊडस्पीकरवर मंगलाष्टकं
म्हणण्याची इच्छा असणार्या हौशी कलावंतांची एकच गर्दी उसळल्यामुळे
मंगलाष्टकं संपतच नव्हती. लाऊडस्पीकरचा आवाज फाटत असल्यामुळे आणि त्यातच
वर्हाड्यांच्या हलकल्लोळामुळे नक्की काय सुरू आहे हे कळतच नव्हतं. हे सगळं
कमी होतं म्हणून की काय, त्यात आणखीन भर पडली ती एकही सूर न सापडणार्या
सनईवादकाची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याची साथ करण्याचा प्रयत्न
करणार्या चौघड्यांचा वादक यांच्या गोंधळाची! या सगळ्या गोंधळामुळे
भांबावलेली मी चक्क भटजींच्याच गळ्यात हार घालणार होते! पण, वेळीच भटजींनी
केलेल्या कल्ल्यामुळे मी सावरले. नाहीतर... पुढची कल्पना न केलेलीच बरी!
झालं असं की, या सगळ्या गोंधळात कुणीतरी मला जोरात चिमटा काढला आणि
म्हणाले- ‘‘अगं, हार घाल ना.’’ गोंधळामुळे अंतरपाट केव्हा बाजूला झाला,
आम्हा दोघांनाही कळलं नाही! पण, जेव्हा आम्ही एकमेकांना बघितलं तेव्हा
ओळखलंच नाही. हाच का तो? असा प्रश्न मला क्षणभर पडला. गर्दी आणि होणार्या
धक्काबुक्कीमुळे बाशिंग आणि मुंडावळ्या डोळ्यांवर आलेल्या, विस्कटलेले
केस, हातातल्या हाराला जवळपास फक्त दोराच उरलेला होता. म्हणायला दोनचार
फुलं आणि खालचा गोंडा तेवढा उरलेला होता. धोतर आणि सदरा विस्कटलेल्या
अवस्थेत आणि घामाने भिजलेला होता. ह्यांंचा हा अवतार बघून मीही किती सुरेख
दिसतेय याची कल्पना मला आली. एकमेकांना पाहताच प्रेमाचे अंकुर
फुटण्यापेक्षा आमच्या नजरेत लाचारी आणि अगतिकताच दिसत होती. आजूबाजूला
असलेल्या गर्दीतून कुणी दोघा-चौघांनी आमच्या हाताने हार घालून घेतले.
झालं.... एकदाचं लग्न पार पडलं. मला बरंच
हायसं वाटत होतं. तेव्हाच कुठल्याशा अनोळखी वहिनींनी मला वरातीसाठी तयार
करून बाहेर आणलं. मला पाहताच पतिराजांना आलेल्या अनावर हास्यामुळे, मी किती
सुंदर दिसतेय् याची मला कल्पना आली. याचं कारण होतं- वेणीच्या टोपापासून
ते कंबरपट्ट्यापर्यंत झेंडूच्या टपोर्या फुलांच्या दागिन्यांनी मी नटले
होते. या संपूर्ण अवतारात खुलून दिसत होत्या त्या गाडीच्या हेडलाईटसारख्या
दिसणार्या टपोर्या झेंडूच्या मुंडावळी. कसेबसे मी स्वत:ला सावरले आणि
वरातीसाठी आम्ही बाहेर आलो. गृहप्रवेशाच्या कल्पनेने होणार्या आनंदाची
जागा आता पोटात पडणार्या खोल खड्ड्यांनी घेतली. कारण, आता बैलबंडीची जागा
सजलेल्या दमणीने घेतली होती. (कितीही सजवला तरी वाघ तो वाघच राहणार!) दमणी
बघून तर माझे डोळेच पांढरे झाले. केलेल्या या साजशृंगारासहित इथून पळ
काढावा, असा विचार मनात येऊन गेला. पण, ते शक्य नसल्यामुळे आम्ही दोघंही
दमणीत जाऊन बसलो. दमणीपुढे बॅण्ड आणि गॅसबत्तीवाले आणि मागे जवळजवळ
अर्धेअधिक गाव. हे कमी होतं म्हणून की काय, आमच्या मांडीवर, रडणारी दोन-चार
पोरं आणून बसवलीत. या सगळ्या कल्ल्यात बॅण्डवर गाणं वाजत होतं- ‘जीवनात ही
घडी अशीच राहू दे.’ पण, प्रत्यक्षात मात्र मुलांना सांभाळताना आणि त्यांची
भांडणं सोडवताना डोक्याच्या मुंडावळ्या गळ्यात आणि कंबरपट्टा डोक्यावर आला
होता. लहानशा वेणीवर महत्प्रयासाने लावलेली फुलांची वेणी म्हणजेच टोप
गळून ह्यांंच्या मांडीवर रडणार्या मुलाच्या हातात दिसत होता! गळ्यातल्या
हाराने तर माझ्या मुसक्या बांधल्या जातील की काय, असं वाटत होतं. दागिने
सांभाळावे की मुलं, या द्विधा मन:स्थितीत असलेली मी, आयुष्यात अशी घडी
पुन्हा कधीच येऊ नये, असा विचार करत होते. दोन तासांची मिरवणूकरूपी वरात
आटोपून आम्ही घरी पोहोचलो. गृहप्रवेशाच्या वेळी माझा अवतार बघून
वर्हाड्यांमध्ये एकच हशा पिकला. वेणीतून निघालेले केसांचे बुचके, अर्धवट
सुटलेलं पातळ, अर्धेअधिक दागिने केव्हाच पडले होते. पण, जे उरले होते ते
फक्त दोर्यांच्या रूपातच होते! डोळ्यांखाली काळं आलेलं. वरातीत
कार्ट्यांनी फार पिडलं होतं. बाकीची मुलं घर येताच पळून गेली, पण वन्संचं
लहान कार्ट मात्र मला म्हणजे मामीला सोडतच नव्हतं.
रात्री जेवण आटोपून आम्ही झोपायला गेलो.
झोप येऊ लागताच मयालीवरून जाणार्या भल्यामोठ्या उंदराला बघून माझी झोपच
उडली. मी लगेच बाजूला झोपलेल्या आत्यांच्या पांघरुणात शिरले. त्याक्षणी
माझ्या सख्ख्या आत्यांइतक्याच आतेसासूबाई मला जवळच्या भासत होत्या. रात्र
कशीबशी काढली.
पुढचे दोन-तीन दिवस परळ आणि कुलदेवीदर्शन
यातच गेले. इथून पुढे माझ्या खर्या परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी
दादांनी म्हणजे सासर्यांनी मला, अंगणात शेणाचा सडा घालून चुलीखाली जाळ
करण्यास फर्मावले. मला हे सगळं नवीनच होतं. पण, यात काय कठीण आहे, असा
विचार करत मी अंगणात शेणाचा दाट सडा घातला. एक काम जमल्याच्या आनंदात मी
चहा घेत असतानाच दादांचा ओरडण्याचा आवाज आला, ‘‘अंगणात एवढे गहू कुणी
सांडवले?’’ मला झाल्या प्रकाराचा उलगडा झाला. आदल्या दिवशी गाईने गव्हावर
येथेच्छ ताव मारला होता आणि त्याचीच फलश्रुती अंगणात विखुरलेली दिसत होती!
घडलेला प्रकार कळताच दादा शांत झाले; झालेल्या फजितीने फाजील
आत्मविश्वासाची आणि शहरी बाण्याची ऐसीतैसी झालेली मी आईंच्या आश्रयाला
गेले. चुलीखाली जाळ कसा करायचा ते आईंनी मला समजावून सांगितले. श्रीगणेशाला
स्मरून मी चूल पेटविण्यासाठी न्हाणीघरात गेले. पण, हायरे दैवा! इथेही
गोवर्या आणि लाकडं ओलसर असल्यामुळे न्हाणीघरात खूप धूर कोंडला. माझ्या
नाकाडोळ्यांत धूर गेल्यामुळे गुदमरून जीव जायची वेळ आली. माझी अवस्था ‘इकडे
आड तिकडे विहीर’ अशी झाली होती. कारण, कोंडलेल्या धुरामुळे आत बसवत नव्हतं
आणि चूल पेटवल्याशिवाय बाहेर यायला लाज वाटत होती. त्या क्षणी मनात विचार
आला, ‘‘इथून जिवंत बाहेर पडले, तर चांगल्या ज्योतिषीला पत्रिका दाखवेन.
मेलं टाकलेलं प्रत्येकच पाऊल उलट कसं काय पडतंय्?’’
न्हाणीघरातून निघणारे धुराचे लोंढे बघून
दादा धावतच आले आणि मला बाहेर पाठवून त्यांनी चुलीखाली जाळ केला.
सांगितलेल्या दोन्ही कामांत मी चुकल्यामुळे मला रडूच कोसळलं. मी रडत असताना
अचानक मायेचा हात पाठीवरून फिरवत दादा मला म्हणाले, ‘‘अगं, रडू नकोस.
हळूहळू सगळी कामं जमतील तुला. तू प्रयत्न केलास यातच तुझं कौतुक आहे. मी
घेतलेल्या परीक्षेत तू पास झालीस.’’ दादांच्या या धीराच्या शब्दांना गाठीशी
धरून पुढे ही सगळी कामं मी शिकले आणि सगळ्यांची लाडकीही झाले.
या सगळ्या दिव्यातून बाहेर पडल्यानंतर मला कळलं की, लग्नाच्या वेळी ‘शुभमंगल साऽऽऽवधाऽन’ का म्हणतात ते...
No comments:
Post a Comment