Numerology - Bagyank

भाग्यांक

संख्याशास्त्रात मूलांकाबरोबर भाग्यांकही तितकाच महत्त्वाचा असतो. मूलांकात केवळ जन्मतारखेचा अंतर्भाव असतो, पण भाग्यांकात जन्मतारीख, जन्ममहिना व जन्मवर्ष यांचा समावेश असतो. या तिन्हीची बेरीज केली असता त्या बेरजेचा जो एकांक येतो त्यास भाग्यांक असे म्हणतात.
उदा., १९-३-१९४२ चा भाग्यांक काढू.
१+९+३+१+९+४+२=२९= २+९= ११= १+१= २
हा वरील जन्मतारखेचा भाग्यांक. मूलांकाबरोबर भाग्यांकाचा आधार घेऊन त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या अनेक छटा माहीत करून घेता येतात.
भाग्यांक एक : लहान वयातच नेतृत्वाची आवड निर्माण होते. उत्तम आत्मविश्वास असतो. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ही माणसे वागतात. स्वभाव मनमोकळा, स्वतंत्र विचार तसेच दिलदार वृत्तीने ही माणसे जगतात. उच्च पातळीवरून आपले विचार दुसऱ्यास पटवून देतात. हाताखालच्या व्यक्तीस उत्तम सहकार्य देतात. यांच्या विशाल मनोवृत्तीमुळे यांच्या सभोवतालचा परिवार यांच्याबरोबर कायम स्वरूपात राहतो. नातेवाइकांकडून मिळणाऱ्या पैशाचा योग्य उपयोग करा. नोकरी-धंद्यातले वादविवाद वाढवू नका. अतिमहत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. घाई करू नका. आपले विचार दुसऱ्यावर कधीही लादू नका.
भाग्यांक दोन- उत्तम व्यवहारचातुर्य हा यांचा सर्वोत्तम गुण आहे. सहकार्याने कामाचा उरक उत्तम रीतीने करतात. वक्तृत्वाची छाप समोरील व्यक्तीवर पडते. मित्रपरिवार वाढत असतो. पण जिद्दी, हट्टी स्वभावामुळे खूप वेळा नाराजीचे प्रसंग ओढवतात. हे लोक सार्वजनिक क्षेत्रात घेतलेल्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडतात. यांना पैशाची किंमत कळत नाही. बराच पैसा उधळतात. यांनी अधिक भावनावश होऊन प्रेमप्रकरणात भाग घेऊ नये. चूक झाली तर लगेच माफी मागून मोकळे व्हावे. नकारात्मक विचार करण्याची सवय सोडून द्या. अकारण वाटणाऱ्या भीतीचा शेवट करावा आणि भयमुक्त व्हावे.
भाग्यांक तीन- यांच्यात उत्तम आत्मविश्वासाला साजेलसे सद्गुणही असतात. कल्पक बुद्धी असते. नोकरीधंद्यात आपल्या हुशारीने ही माणसे पुढे जातात. प्रामाणिकपणा, धडाडी, दृढनिश्चय, कर्तृत्वावर यांचा पूर्ण विश्वास असतो. धार्मिक व सामाजिक कार्यात यांचा उत्तम सहभाग असतो. या व्यक्ती धार्मिक, सहिष्णू असल्या तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची यांची धारणा असते. सुख:दुखात स्वत:ला व दुसऱ्याला सावरण्याची ताकद असते. यांच्यापाशी असलेला संयम यांच्यातील साधुत्व टिकवेल. मात्र धार्मिक बाबतीत खूप हळवेपणाने वागू नका. हळू आवाजात, सावकाशपणे बोलून आपले विचार समोरील व्यक्तीस समजून द्या.
भाग्यांक चार- यांना ‘शांतिदूत’ म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. . जाहीरपणे बोलणे, भाषण करणे आदी गोष्टी यांना मनापासून आवडत नाहीत. खासगीत मात्र बोलून समोरच्या माणसाला आपले मत कसे बरोबर आहे ते पटवून देतील. यांनी उद्योगधंदा करताना जाणकाराचा सल्ला घ्यावा किंवा आपली कुवत ओळखून धंद्यात भाग घ्यावा. निर्थक कामात पैसा गुंतवून या व्यक्ती कधीकधी स्वत:ची फसवणूक करवून घेत असतात. आपल्या साधेपणाचा फायदा इतरांना घेऊ देऊ नका. तसेच मित्राची पारख करून घ्या.
भाग्यांक पाच- धडाडीने सामोरे जाण्याची हिंमत या व्यक्तींपाशी उत्तम असते. बुद्धिमान, विचार करण्याची वेगळी पद्धत यामुळे या व्यक्ती समाज व राजकारणात खूप पुढे जातात. यांच्यापाशी उत्तम वक्तृत्व असते. आर्थिक आवक उत्तम असते, पण उधळपट्टीत सारा पैसा घालवतात. उगाच मोठेपणा करणे हा यांचा अवगुण आहे. नातेवाईक, मित्रमंडळीत वाद घालू नका. वेळेचा योग्य वापर करा. सल्ला देण्यापेक्षा सल्ला विचारा. आपल्या सर्व गोष्टी जगाने ऐकाव्यात हा हेका सोडून द्या.
भाग्यांक सहा- जगात प्रेमाची सत्ता कायम चालते हे तत्त्वज्ञान ही माणसे मनोमन मानत असतात. अतिशय प्रयत्नवादी हाती घेतलेले काम पुरे केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. ही माणसे उत्तम मित्र आणि उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्ध पावतात. या व्यक्ती अतिशय भावनाप्रधान असतात. हा दोष यांना खूप त्रासदायक ठरतो. रोज स्वत:चा शोध घ्या. स्वत:ची किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न करा, कारण तुमच्यातल्या आंतरिक गोष्टी खूप काही घडवू शकतात. तुम्ही तुमच्या विचारातून घडत आहात याची जाणीव ठेवा.
भाग्यांक सात- अशा व्यक्ती संशोधकवृत्तीच्या असतात. गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचा ठाव घेणे यांना आवडत असते. या लोकांत प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यामुळे येणाऱ्या संकटावर ते सहज मात करू शकतात. साहस आणि निर्भयता या दोन गुणांचा आविष्कार यांच्या मनात सतत वावरत असतो. तत्त्वज्ञान, गूढशास्त्रे, संगीत यांची यांना आवड असते. या गोष्टींत यांचा उत्तम नावलौकिक होतो. उत्तम प्रतिभाशैली यांच्यापाशी असते. तेव्हा यांनी लिखाण करावे. नावलौकिक, प्रतिष्ठा वाढेल. शक्यतो भागीदारीत धंदे करू नये. स्वत:ला कधीही कमी लेखू नये.
भाग्यांक आठ- अबोल, करडी शिस्त व चिकाटी यामुळे यांच्या कर्तृत्वाला एक वेगळीच धार येते. अगदी लहान वयात यांना पैशाची किंमत कळते, त्यामुळे या व्यक्ती शक्यतो पैसा फार जपून वापरतात. न्यायदृष्टीने पाहण्याची वृत्ती, त्यामुळे यांच्यावर जर कोणी अन्याय केला तर ते कदापि सहन करत नाहीत. राजकारणातील डावपेच जाणून राजकारणात आपले स्थान कसे टिकवावे याची यांना उत्तम जाण असते. आपल्या दूरदृष्टीचा उपयोग स्वत:साठी करावा. अति भावविवश होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. भूतकाळातल्या आठवणींवर जगू नका. भविष्यकाळातल्या सकारात्मक घटनांची यादी मनात तयार करा.
भाग्यांक नऊ- या व्यक्ती खूप निर्भय, पण मनाने अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे मनासारखे काही घडले नाही की यांचे मानसिक संतुलन बिघडते. अगदी लहानसहान गोष्टींसाठी संघर्ष करायची यांची तयारी असते. या लबाडी, फसवणूक करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आध्यात्मिक क्षेत्रात यांची उत्तम प्रगती होते. यांनी समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न करावा. बुद्धिमत्ता कशी वापरली जाईल ते पाहावे. कारण आपली योग्यता कधीकधी खूप उशिरा कळते. दुसऱ्याला समजून घेण्यातला आनंद शोधावा.

No comments:

Post a Comment