कार्तिक
शुक्ल द्वादशीला तुळशीचे लग्न लागले की मग लग्नांचा मोसम सुरू होतो.
लग्नाच्या मुहूर्ताना सुरुवात होते. ज्यांच्या घरी मुलामुलींची लग्ने
ठरलेली असतात त्यांच्या घरी मग लगीनघाई सुरू होते. खेडेगावी घरासमोरील
अंगणात मांडव घालून लग्नसमारंभ केले जातात. पण शहरात लग्न ठरताक्षणी अगोदर
पंचांगातील विवाहमुहूर्त पाहिले जातात. सोयीचा मुहूर्ताचा दिवस ठरवून हॉल
आणि लग्न लावणारा पुरोहित बुक केला जातो. जेवणाचे, विवाह साहित्याचे आणि
सर्व व्यवस्थेचे कॉन्ट्रॅॅक्ट दिले जाते. निमंत्रणपत्रिका छापून
आप्तेष्ट-मित्रांना निमंत्रणे देण्याचे काम सुरू होते. मग वधूसाठी साडय़ांची
खरेदी, दागिन्यांची खरेदी, वरासाठी पोशाख, हौसमौज कोणती करायची, सर्व
गोष्टी ठरविल्या जातात. प्रत्येक कुटुंबात एखादा ‘नारायण’ असतो.
त्याच्याकडे सर्व कामांच्या याद्या दिल्या जातात.
विवाहाचा संस्कार
हिंदू संस्कृतीमध्ये विवाह हा एक पवित्र संस्कार मानला
जातो, तर काही संस्कृतींमध्ये विवाह हा एक करार समजला जातो. करारातील
अटींचा भंग झाल्यावर करार संपुष्टात येतो. पती-पत्नी विभक्त होतात, परंतु
संस्काराने बद्ध झालेले वधू-वर दुर्दैवाने परस्परांपासून दूर झाले तरीही
वियोगाची कारणे दूर झाल्यावर ते परत एकत्र येऊन संसार करू शकतात. एवढेच
नव्हे तर ती दोघे एकत्र न आली तरी त्यांचे पती-पत्नी हे नाते अभंग राहते.
कारण त्या दोघांत कराराने नव्हे तर पवित्र संस्काराने नाते निर्माण झालेले
असते.
शुक्ल पक्षातील सर्व तिथी आणि कृष्ण
त्रयोदशीपर्यंतच्या सर्व तिथी विवाह मुहूर्तासाठी चालू शकतात. श्रम-वृद्धी
तिथींचे दिवस मात्र टाळले जातात. अश्विनी, रोहिणी, मृग, मघा, उत्तरा,
हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, उत्तरा
भाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्रे विवाह मुहूर्तासाठी शुभ मानली जातात.
विवाह संस्था ही कुटुंब
संस्थेपुरतीच मर्यादित नसते तर तिला सामाजिक अनुबंध असतो. गुणी, नीतिमान,
चारित्र्यसंपन्न, परोपकारी अशी विवाहित दाम्पत्ये समाजाच्या उत्कर्षांला
उपयोगी पडू शकतात. समाजाचे अस्तित्व टिकावे, त्याचा उत्कर्ष व्हावा यासाठी
समाजात सुप्रजा निर्माण होण्याची नितांत आवश्यकता असते. सुप्रजा निर्माण
व्हावयाची असेल तर विवाहसंस्था मजबूत असावी लागते. धर्मसंपत्ती आणि
प्रजासंपत्ती हे विवाहाचे प्रयोजन असते.
विवाह मुहूर्त
विवाह कोणत्या दिवशी करावा यासंबंधी काही नियम मुहूर्त
मरतड, मुहूर्त चिंतामणी इत्यादी ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या
शुभकार्यासाठी वेगवेगळे नियम मुहूर्तासाठी देण्यात आलेले आहेत. विवाहास
मेष राशीत सूर्य असताना चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, मिथुन राशीत सूर्य असताना
शुक्ल दशमीपर्यंत आषाढ, वृश्चिकेत सूर्य असताना कार्तिक शुक्ल एकादशीनंतरचे
दिवस, मार्गशीर्ष, मकर राशीत सूर्य असताना पौष, माघ आणि फाल्गुन हे महिने
योग्य म्हणून सांगण्यात आलेले आहेत. शुक्ल पक्षातील सर्व तिथी आणि कृष्ण
त्रयोदशीपर्यंतच्या सर्व तिथी विवाह मुहूर्तासाठी चालू शकतात. श्रम-वृद्धी
तिथींचे दिवस मात्र टाळले जातात. अश्विनी, रोहिणी, मृग, मघा, उत्तरा, हस्त,
चित्रा, स्वाती, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, उत्तरा
भाद्रपदा आणि रेवती ही नक्षत्रे विवाह मुहूर्तासाठी शुभ मानली जातात. विवाह
मुहूर्तासाठी वैधृति, व्यतिपात योग पूर्ण वज्र्य असतात.
परिघ योगाचा पूर्वार्ध वज्र्य म्हणून सांगण्यात आलेला आहे. विष्कंभ,
व्याघात, शूल, वज्र, गंड, अतिगंड या योगांचा काही भाग वज्र्य म्हणून
सांगण्यात आलेला आहे. असे सर्व नियम लक्षात घेऊन विवाह मुहूर्ताचे दिवस
काढले जातात. ग्रहणाच्या आधीचे व नंतरचे दिवस किती टाळायचे हे ग्रासमानावर
अवलंबून असते. अयन दिन, करण दिन, विष्टी करण हे दिवसही टाळले जातात. एकदा
विवाह मुहूर्तासाठीचे दिवस निश्चित झाले की मग शुभलग्न, शुभवेळ काढली जाते.
त्यासाठीही बरेच नियम व अपवाद सांगण्यात आलेले आहेत. अभिजित लग्नावर जे
मुहूर्त दिलेले असतात ते सूर्योदय आणि दिनार्ध यांच्या वेळेची बेरीज करून
दिलेले असतात. गोरज मुहूर्ताची वेळ ही गुरुवारी सूर्यास्तानंतर दोन
मिनिटांची आणि इतर वारी सूर्यास्तापूर्वी सहा मिनिटांची असते. विवाह
मुहूर्ताची वेळ ठरविताना बरेच नियम विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर विवाह
मुहूर्ताचा दिवस व वेळ निश्चित केली जाते. पंचांग तयार करताना हे काम जास्त
क्लिष्ट असते. कारण नियम इतके आहते ते सर्वच नियम पाळून मुहूर्ताचे दिवस व
वेळ मिळणे कठीण जाते. गुजरातमध्ये रात्रीही विवाहाचे मुहूर्त देण्यात
येतात. महाराष्ट्रात मात्र रात्री विवाह मुहूर्ताची प्रथा नाही, गोरज
मुहूर्त हेच उशिरात उशिरा दिलेले असतात.
वधूपिता गावाच्या सीमेवर जाऊन वराचे
पूजन करतो तो सीमांत पूजनाचा विधी संपन्न होतो. त्यानंतर वधू गौरीहराची
म्हणजे इंद्राणीची प्रतिमा स्थापून इंद्राणीपूजा करते. त्यानंतर वधूच्या
मातापित्यांनी वरपूजा करावयाची असते.
मध्यंतरी कोल्हापूर येथे
सर्व पंचांगकर्त्यांची सभा करवीर पीठाच्या शंकराचार्यानी बोलाविली होती.
त्या वेळी चातुर्मासात विवाह मुहूर्त देण्यासाठी माननीय शंकराचार्यानी
परवानगी द्यावी अशी विनंती मी केली होती. परंतु शंकराचार्यानी तशी परवानगी
दिलेली नाही. सध्या आम्ही पंचांगकर्ते जास्तीत जास्त अपवादांचा उपयोग करून
जास्तीत जास्त विवाह मुहूर्त देण्याचा प्रयत्न करीत असतो. शुभ मुहूर्तावर
विवाह व्हावा हा श्रद्धेचा प्रश्न असतो. त्यामुळे नियम पाळून विवाह मुहूर्त
देणे क्रमप्राप्त असते. तरीही मग यजमानाला पाहिजे असेल तर काही पुरोहित
काढीव मुहूर्त (काही दोष गृहीत धरून) देत असतात.
शुभ मुहूर्तावर विवाह केला तर तो सौख्यदायी होतो,
अशी लोकांची श्रद्धा असते. मनाच्या स्वास्थ्यासाठी हे आवश्यक असते.
पंचांगात जी मुहूर्तवेळ दिलेली असते, त्या मुहूर्त वेळेवर वधूवराच्या मधील
अंत:पट दूर केला जातो. वधू वराच्या गळ्यात पुष्पमाला घालते आणि वर वधूच्या
गळ्यात पुष्पमाला घालतो, त्यापूर्वी मंगलाष्टके म्हटली जातात. मुहूर्त
वेळेपर्यंत मंगलाष्टके पूर्ण होतील याची काळजी विवाह लावणारे पुरोहित घेत
असतात. विवाह मुहूर्ताची वेळ ही पुष्पमाला घालण्याची असते.
विवाह विधी
गृहस्थाश्रम हा सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. माणसाला
निसर्गत:च देव, कृषी, पितर यांचे उपकार स्वीकारावे लागतात अशी श्रद्धा आहे.
गृहस्थाश्रम धर्मपरिपालनानेच आपण त्या उपकारातून थोडी तरी उतराई होऊ शकतो.
धर्म, अर्थ आणि काम यांचे श्रेयस्करी साफल्य गृहस्थाश्रमातच साधता येते.
गृहस्थाश्रम धर्माचरणाची योग्यता विवाह संस्कारानेच प्राप्त होते. विवाह आठ
प्रकारचे आहेत-
१. ब्राह्म विवाह, २. दैव विवाह, ३. आर्ष विवाह, ४. प्राजापत्य विवाह ५.
आसुर विवाह, ६. गांधर्व विवाह, ७. राक्षस विवाह आणि पैशाचा विवाह. सध्या
श्रेष्ठ अशा ब्राह्म विवाहाचीच प्रथा रूढ आहे.
ब्राह्म विवाहामध्ये विवाह होम आणि गृहप्रवेशनीय होम
हे दोन प्रमुख विधी असतात. विवाह होममध्ये होम, पाणिग्रहण, लाजा होम,
अग्निप्रदक्षिणा, अश्मारोहण, सप्तपदी आणि ध्रुवादिदर्शन हे विधी असतात. आणि
गृहप्रवेशनीय होमामध्ये गृहप्रवेश, होम, वधूला उपदेश आणि देवता प्रार्थना
असे विधी सामान्यत: असतात. या प्रमुख विधींखेरीज अक्षम, घाणा भरणे,
साखरपुडा, उष्टी हळद, गडगनेर (केळवण), तेलसाडी व तेलफळ, रुखवत, आंबवण,
वराचे रुसणे, सूनमुख, व्याहीभोजन, रासन्हाणे, विडे तोडणे, रंग खेळणे, झेंडा
नाचविणे वगैरे लौकिक आचारप्राप्त विधीविवाह समारंभात अंतर्भूत असतात.
त्याचप्रमाणे पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, मंडपदेवता स्थापन, वाग्दान,
सीमांतपूजन, ऐरिणीपूजन वगैरे विधी संस्कार म्हणून केले जातात.
पूर्वी खेडेगावात हे विवाह विधी चार-चार दिवस चालत
असत. सध्या वर-वधूच्या माता-पित्यांना वेळ नसतो. विवाह लावणाऱ्या
पुरोहितांना वेळ नसतो. आप्तेष्ट मित्रांनाही वेळ नसतो आणि महत्त्वाचे
म्हणजे वधू-वरांनाही एवढा वेळ नसतो. त्यामुळे महत्त्वाचे विधी करून विवाह
सोहळा संपन्न होतो. आप्तेष्टांना रूचकर भोजन-पार्टी दिली की मग कुणाचीच
तक्रार राहत नाही. कधी कधी हॉल दोन लाखासाठी मिळतो तेथे तर दोन तासात विवाह
सोहळा साजरा केला जातो.
वाग्दान (वाङ्निश्चय) विधीमध्ये वधू आणि वर यांच्या
पालकांनी परस्परांना विवाहविषयक वचन देण्याचा कार्यक्रम असतो. त्यानंतर
वराकडील मंडळी विवाहासाठी वधुगृही येण्यासाठी निघतात. वधूपिता गावाच्या
सीमेवर जाऊन वराचे पूजन करतो तो सीमांत पूजनाचा विधी संपन्न होतो. त्यानंतर
वधू गौरीहराची म्हणजे इंद्राणीची प्रतिमा स्थापून इंद्राणीपूजा करते.
त्यानंतर वधूच्या मातापित्यांनी वरपूजा करावयाची असते. वरपूजनाच्या वेळी
वराने मधुपर्काचे (मध आणि दही यांचे) प्राशन करावयाचे असते. त्या वेळच्या
मंत्रांमध्ये ‘वायु सुखकर होवो. नद्या सुखकर होवोत. औषधी मधुर मधुर फलपुष्प
देणाऱ्या होवोत. रात्र, सकाळ , मातृदेवता पृथ्वी, पितृदेव आकाश ही आम्हाला
सुखप्रद होवोत. विशाल वृक्ष, सूर्य आणि तेजस्विता ही आम्हाला सुखप्रद
होवोत,’ असे म्हटले जाते. त्यानंतर वधूवरांचे परस्पर निरीक्षण हाच प्रमुख
लौकिक विधी केला जातो. सुस्वर गायनाने मंगलाष्टके म्हटली जातात. मुहूर्तकाळ
जवळ येताच ‘तदेव लग्नं’ हा मंत्र म्हणून अंत:पट उत्तरेकडे काढून घेऊन
वधूवर आपापल्या हातातील तांदूळ , जिरे, गूळ हे पदार्थ एकमेकांच्या मस्तकावर
अर्पण करतात. एकमेकाला पुष्पमाला अर्पण करतात. वर वधूकडे पाहात मंत्र
म्हणतो- ‘हे वरूणा! भावांना सुखकारक, हे बृहस्पते! पतीला सुखकारक, हे
इंद्रा! पुत्रांना सुखकारक, हे सूर्या! लक्ष्मीदायक अशी ही वधू असू द्या.
हे वधू! हे शुभदृष्टी, पतीला कल्याणदायक, पशूंना सुखदायक व पवित्र
अंत:करणाची अशी हो. तू कांतिमान असावीस, तू वीरांना जन्म देणारी
श्रद्धायुक्त आणि सुखप्रद असावीत.’ त्यानंतर कन्यादान विधी संपन्न होतो.
त्या वेळी कन्यापित्याने म्हणावयाचे मंत्र खूप महत्त्वाचे आहेत.
‘कन्या तारक होवो. पुण्य अभिवर्धित होवो. उदक
शुभप्रद असो. परस्परांची मने शुद्ध असोत. अखंड समृद्धी, दीर्घायुष्य,
कल्याण, शांती, पुष्टि, संतोष ही प्राप्त होवोत. जे कल्याणप्रद ते राहू दे
आणि जे वाईट ते नष्ट होऊ दे.’ त्यानंतर मंत्राभिषेक होऊन कंकणबंधनाचा विधी
संपन्न होतो. त्यानंतर होणाऱ्या अक्षतारोपणाचा विधी संपन्न होतो. त्यानंतर
होणाऱ्या अक्षतारोपणाच्या विधीमधील वधू-वर संवाद असा होतो-
वधू-माझी ऐश्वर्याची इच्छा पूर्ण होवो.
वर- माझी त्यागाची इच्छा पूर्ण होवो.
वधू- माझी संपत्तीची इच्छा पूर्ण होवो.
वर- माझी धर्माची इच्छा पूर्ण होवो.
वधू- माझी संततीची इच्छा पूर्ण होवो.
वर- माझी यशस्वितेची इच्छा पूर्ण होवो.
त्यानंतर वर वधूच्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो.
त्यानंतर विवाहहोम, सप्तपदी, ध्रुवदर्शन, गृहप्रवेशनीय होम, ऐरिणीदान विधी
झाल्यावर वरात निघते आणि वर वधूला घेऊन स्वत:च्या घरात प्रवेश करतो. घरात
आल्यावर गणपती पूजन, पुण्याहवाचन, लक्ष्मीपूजन, महालक्ष्मी पूजन इत्यादी
विधी कुलाचाराप्रमाणे केले जातात.
विवाह सोहळ्यात वेदोक्त किंवा
पुराणोक्त मंत्र म्हणतात. हे सर्व मंत्र संस्कृतमध्ये असतात. खरे तर
त्यांचा थोडक्यात अर्थ पुरोहितांनी मराठीत वधू-वरांना समजावून सांगितला तर
विवाह संस्कारांचे महत्त्व वधू-वरांना पटेल.
सप्तपदीच्या वेळी वराने म्हणावयाचे मंत्र खूप महत्त्वाचे आहेत-
१) हे वधू! तू माझ्याबरोबर एक पाऊल चाललीस तेव्हा
तुझे माझे सख्य झाले आहे. तू मला अन्न देणारी हो. मला अनुकूल वाग. आम्हा
उभयतांना संतती होवो. ती दीर्घायुषी होवो.
२) हे वधू! तू माझ्याबरोबर दोन पावले चाललीस. तू माझे बळ वाढव, मला अनुकूल वाग.
३) हे वधू! तू तीन पावले चाललीस. माझे धन वाढविणारी हो.
४) हे वधू! तू चार पावले चाललीस. तू सुख वाढविणारी हो.
५) हे वधू! तू पाच पावले चाललीस. तू संतती वाढविणारी हो.
६) हे वधू! तू सहा पावले चाललीस. सहाही ऋतूंत प्राप्त होणारे ते ते भोग देणारी हो.
७) हे वधू! तू माझ्याबरोबर सात पावले चाललीस. तुझे माझ्याबरोबर दृढ सख्य होवो.
विवाह सोहळ्यात वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्र
म्हणतात. हे सर्व मंत्र संस्कृतमध्ये असतात. खरे तर त्यांचा थोडक्यात अर्थ
पुरोहितांनी मराठीत वधू-वरांना समजावून सांगितला तर विवाह संस्कारांचे
महत्त्व वधू-वरांना पटेल. त्यातील महानता त्यांच्या लक्षात येईल.
महाकवी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलमध्ये कण्व ऋषी सासरी जात असलेल्या शकुंतलेला निरोप देताना म्हणतात-
शुश्रूषस्व गुरून् कुरू प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने।
भत्तरुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गम:।।
भूयिष्ठं भव दक्षिणा परिजने भोगेष्वनुत्सेकिनी।
यान्त्येवं गृहिणीपदं युवतयो वामा: कुलस्वाधय: ।।
(भावार्थ : वडीलधाऱ्यांची सेवा कर. पतीच्या
मैत्रिणींबरोबर प्रिय मैत्रिणीप्रमाणे वाग. काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या
तरी रागाने पतीच्या विरुद्ध जाऊ नकोस. नोकरांशी सौजन्याने वाग. अन्याय करू
नको. केवळ भौतिक साधनांवर समाधान मानू नको. अशाप्रकारे वागणाऱ्या स्त्रिया
यशस्वी गृहिणी होतात. या उलट आचरण करणाऱ्या स्त्रिया अयशस्वी होतात.)
विवाह हा जसा सौख्यप्राप्तीसाठी असतो तसाच तो
सुप्रजानिर्मितीसाठी असतो. पती-पत्नीनी सुसंस्कारीत संतती निर्माण करावयाची
असते. आदर्श समाज निर्माण करावयाचा असतो. विवाहामुळे दोन कुटुंबे एकत्र
येत असतात. विवाह संस्काराने दोघांची मने जुळली जातात. एकमेकाला समजून
घ्यावयाचे असते. सामाजिक बंधने पाळून कुटुंबाचा उत्कर्ष साधावयाचा असतो.
राष्ट्रप्रेम, समाजातील गरिबांना मदत, नैतिकतेचे आचरण, सामाजिक शिस्त,
सदाचार, आदर्श चारित्र्य या गोष्टींचे पालन करून उन्नती साधावयाची असते.
विवाह संस्था ही किती प्राचीन आहे हे सांगणारी एक
कथा आहे. पृथ्वी आणि आकाश ही दोघे प्रथम एकत्र होती. पुढे ती दूर जाऊ
लागली. ते दूर जाणे त्यांना बरे वाटले नाही म्हणून ती एकमेकांना म्हणाली-
‘आपण विवाह करू आणि एकत्र राहू.’ पृथ्वी आणि आकाश यांचा हा आदर्श मानवांनी
मानला आणि आपल्या समाजात विवाह संस्था रूढ केला. विवाह संस्थेचे स्वरूप
अतिशय मंगल, पवित्र आणि उदात्त असे आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या,
स्वकेंद्रित वृत्तीच्या आणि वाढत्या घटस्फोटाच्या जमान्यात हे सर्व समजून
घेतले पाहिजे. या बदलत्या जगात अधिक सावधानता ठेवली पाहिजे. म्हणून
म्हणतात-
‘शुभमंगल सावधान!’ |
No comments:
Post a Comment