Wednesday, January 28, 2015

चारचौघींसारखी वेगळी! Lagnachi Vegali Goshta

चारचौघींसारखी वेगळी!


माझ्या मोठय़ा बहिणीचं लग्न होतं ना होतं तोच आई-बाबांनी माझ्याही लग्नाची मोहीम हाती घेतली. तसं पाहिलं तर माझ्या लग्नाचा विचार ताईच्या लग्नापर्यंत कुणाच्याच मनात आला नव्हता. सव्वीस वषार्र्ची झाले तरीही मी सगळय़ांमध्ये लहान, त्यामुळे लाडावलेलीच होते. मी लग्नाच्या योग्य झाले आहे याची जाणीव मला आणि माझ्या घरच्यांना ताईच्या लग्नात झाली, जेव्हा लोकांनी बाबांना विचारलं, ‘काय देशमुखसाहेब अवनीचं लग्न कधी करणार आता?’ त्या क्षणी आई-बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग भयंकर टेन्शन यायला लागलं.
अगदी या क्षणापर्यंत मी माझ्या स्वप्नांच्या जगात वावरत होते. त्या जगात जागा होती फक्तमला, माझ्या ताईला, आई-बाबांना त्याचबरोबर त्या राजकुमाराला जो घोडय़ावर बसून येईल आणि मला घेऊन जाईल. माझ्यासाठी आयुष्याचा अर्थ वर्तमानाला एन्जॉय करणं हाच होता. माझी आवड कॉम्प्युटरवर नवीन नवीन डिझाइन्स तयार करण्यात, मत्रिणींबरोबर वेळ घालवण्यात आणि अडलेल्यांना तन-मन-धनाने मदत करण्यात होती. घरातली कामं करणं, स्वयंपाक करणं यात मला रसच नव्हता. आई म्हणायची, ‘कसं होणार आहे या पोरीचं सासरी गेल्यावर कुणास ठाऊक? हिची सासू मलाच म्हणेल, काही शिकवलं नाही आईने, बस पाठवून दिलं.’ यावर मी फक्त हसायचे आणि विषय टाळून तिथून निघून जायचे.
आई-बाबांनी लवकरच माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. तशी दिसायला बरी असल्याने आणि शिक्षण चांगलं असल्याने मागणी लवकर यायला लागली. मला एकूण तीन स्थळं आली. त्यातलं तिसरं स्थळ सर्वच दृष्टींनी योग्य होतं. ते स्थळ होतं नागपूरच्या अनुपम श्रीहरी गोखलेंचं. हा मुलगा मुंबईच्या एका कंपनीत सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत होता. त्याचा फोटो जेव्हा बाबांनी दाखवला तेव्हा मी त्याला रिजेक्टच करणार होते, कारण फोटोत तरी तो मला अजिबात आवडला नव्हता. मग ‘ममाज बॉय वाटतो, खूपच गंभीर दिसतो, मुंबईला राहतो, मला नाही जायचंय मुंबईला, नाही करायचं मला याच्याशी लग्न,’ अशी कारणं मी बाबांना दिली. पण ‘बघायला काय हरकत आहे?’ असं सांगून बाबांनी माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला. आणि मी हो म्हणाले. मला अजिबात वाटत नव्हतं की या स्थळाकडून मला पसंती येईल. कारण गोखले म्हणजे कोकणस्थ आणि आम्ही देशमुख देशस्थ. कोकणस्थ आणि देशस्थ यांच्यातलं शीतयुद्ध फार पूर्वापार चालत आलं आहे. मी असं ऐकलं होतं की, कोकणस्थ लोक फार काटेकोर, शिस्तबद्ध, कडक सोवळंओवळं पाळणारे आणि गंभीर असतात. त्यामुळे माझ्यासारख्या स्वच्छंदी देशस्थ मुलीला ते होकार का देतील? हेच माझ्या मनात होतं. पण म्हणतात ना, ‘जोडीयाँ स्वर्ग में बनती है’. पाहता पाहता बघण्याचा दिवस ठरला, वेळ ठरली. माझं बीपी वर-खाली होत होतं, कारण असा बघण्याचा कार्यक्रम माझा पहिलाच होता. एक मुलगी तयार होऊन येते आणि तिला अनोळखी असे काही जण परीक्षकाच्या नजरेने बघतात, हे जरा ऑडच होतं माझ्यासाठी. त्यात साडी घालून जायचं म्हणजे, नको रे बाबा, कुठे पडले वगरे तर? ‘मी साडी घालणार नाही.’ आईला असं सांगून मी मोकळी झाले. आई म्हणाली, ‘ठीक आहे. सलवार सूट घाल, पण दाखवायचा प्रोग्राम करायचाच आहे.’ इकडे टेन्शनपायी माझे हातपाय गळायला लागले. ताई सतत माझी िहमत वाढवत होती. एरवी कोणत्या मुलाने छेड काढल्यावर त्याच्या कानाखाली खाडकन आवाज काढणाऱ्या मला एखादा मुलगा बघायला आल्यावर इतकं टेन्शन येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. त्यात कोण कोण येणार बघायला? कसे असतील ते? मुलगा कसा असेल? काय होईल? या सगळय़ा विचारांनी माझं डोकं गरगरायला लागलं होतं.
ठरल्या दिवशी मुलाकडली मंडळी आली. आई-वडील आणि मुलगा तिघंच. मला जरा आश्चर्यच वाटलं. नाही तर लोक मुलगी बघायला गेले की अख्खं गाव गोळा करून नेतात. आत्या, मामा, मावशी, काका, काकू परंतु हे तिघंच आले. त्यांचं म्हणणं होतं की निर्णय शेवटी आम्हालाच घ्यायचा आहे, योग जुळले तर पुढे सगळय़ांची भेट होईलच. हा त्यांचा साधेपणा अगदी पहिल्यांदा माझ्या आणि कदाचित माझ्या घरच्यांच्या मनालाही स्पर्श करून गेला.
सगळय़ांच्या थोडा वेळ इकडतिकडच्या गप्पा झाल्या आणि मग मला बोलावण्यात आलं. मी स्वत:ला सावरून हॉलमध्ये आले आणि मुलाच्या आईजवळ बसले. मुलाची आई म्हणजे कदाचित माझी भावी सासू. आजूबाजूच्या वातावरणात आणि टीव्हीवरील मालिकांमुळे सासू ही नेहमी खाष्टच असते, असा माझा समज होता. पण या बाईंकडे पाहिल्यावर त्या कुठल्याच दृष्टीने सासूसारख्या वाटत नव्हत्या. उंची साधारण माझ्याएवढीच, दिसायला सुंदर, शांत हसरा असा चेहरा. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, हसल्या आणि माझं टेन्शन कुठल्या कुठे पळून गेलं. कारण त्यांच्या डोळय़ांत मला माझ्या आईचे भाव दिसले, मी जरा सावरले. मग काहीतरी विषय निघावा म्हणून मुलाच्या वडिलांनी मला शिक्षण वगरे विचारलं. ते दिसायला फार स्ट्रिक्ट वाटत होते परंतु त्यांच्याशी बोलत असताना एक गोष्ट जाणवली की, ते स्ट्रिक्ट जरी असले तरी ते माझ्या बाबांसारखेच साधे आणि मोकळेपणाने बोलणारे आहेत. त्यांच्याशी बोलून माझ्या डोक्यावरचं टेन्शन जरा अजून हलकं झाल्यासारखं वाटलं.
आता माझ्यासमोर सगळय़ात कठीण प्रसंग होता. कारण मला आणि त्या मुलाला आमच्या घरच्यांनी बोलायला वेगळय़ा खोलीत पाठवलं. इतका वेळ त्या मुलाकडे मी डोळे वर करूनही पाहिलं नव्हतं. त्याच्याशी एकटं जाऊन बोलायचं? मनात भीती तर होतीच पण अनेक प्रश्नही होते की, ‘मी याच्याशी काय बोलू? या अध्र्या तासाच्या बोलण्यात ‘आम्हाला आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहायचं आहे का?’ हे कसं ठरवता येईल? दुकानात गेल्यावर कपडे घेतानाही मी यापेक्षा जास्त वेळ लावते. व्यवस्थित पारखून-निरखून पसंत पडला तरच ड्रेस घेते आणि आयुष्याचा एवढा मोठा निर्णय इतक्या सहजतेने कसा घेता येईल?’ या विचारातून स्वत:ला बाजूला सारून मग मी त्याच्यासोबत खोलीत गेले. आम्ही दोघंही समोरासमोरच्या खुच्र्यावर बसलो. माझ्यातली सगळी िहमत एकवटून मी त्याच्याकडे पाहिलं तर तो तसा नव्हताच दिसायला जसा मला फोटोमध्ये वाटला होता. माझी पहिली प्रतिक्रिया होती, ही इज सो हँडसम! गोरा गोरापान, डार्क निळय़ा रंगाचा शर्ट, डोळय़ांवर रिमलेस चष्मा, दिसायला अगदी देखणा. अगदी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा. मनातल्या मनात मी स्वत:वर जरा रागावलेच, ‘इतक्या चांगल्या मुलाला तू नाव ठेवलंस?’ त्याच्याकडे बघून असं वाटलं की, त्यालासुद्धा सुचत नव्हतं माझ्याशी काय बोलायचं ते? थोडा वेळ आम्ही दोघंही गप्पच होतो. आम्ही एकमेकांकडे पाहिलं, हसलो आणि परत इकडे-तिकडे बघायला लागलो. मग त्या मुलानेच बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, ‘तुमच्याबद्दल बाहेर सगळं कळलंच, तुम्हाला माझ्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा.’ त्याला काय विचारावं मला सुचेना. थोडा वेळ थांबून मी म्हणाले, ‘तुम्ही मुंबईला नोकरी करता.. मग राहायला स्वत:चं घर आहे की भाडय़ाने राहता?’ या क्षणी हा प्रश्न विचारणं कितपत योग्य होतं मला ठाऊक नाही. परंतु त्या क्षणाला जे सुचलं ते विचारून मी मोकळी झाले. तो थोडा हसला आणि म्हणाला, ‘मी सध्या भाडय़ाने राहतो. पण मी मुंबईला फ्लॅट बुक केला आहे.’ मग मी त्याला अजून असेच काही प्रश्न विचारले. थोडंफार माझ्याबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल सांगितलं. आमच्या बोलण्यात एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तो माझ्याकडे बघून फार कमी वेळा बोलला. एरवी त्याची नजर खालीच. अर्धा-पाऊण तास त्याच्याशी बोलून इतकं तर नक्कीच समजलं की हा साधा, सरळ आणि डिसेंट मुलगा आहे. आमच्या त्या पहिल्या भेटीत तो माझ्या मनात छोटीशी का होईना पण जागा करून गेला.
आमचं बोलणं झाल्यावर आम्ही हॉलमध्ये आलो. थोडा वेळ सगळय़ांच्या गप्पा झाल्या आणि ‘मी तुम्हाला नंतर फोन करतो,’ असं माझ्या बाबांना सांगून ते लोक घरी परतले. ते गेल्यावर माझ्या घरच्यांनी सांगितलं की, ‘लोक फार साधे आहेत. मुलगा एकदम चांगला आहे. त्यांच्याकडून होकार आला तर आपण नाही म्हणायचं नाही.’ बाबांनी मला विचारलं, ‘तुला काय वाटतं?’ मी म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल तसं.’ आता तो मलाही आवडला आहे, हे मी माझ्याच तोंडानं त्यांना कसं सांगणार होते? आणि मनात हा विश्वास तर होताच की माझे आई-बाबा माझ्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. आम्ही सगळेच त्यांच्या होकाराची वाट बघत होतो.
एंगेजमेंट आणि लग्न यांच्यामधले क्षण हे सोनेरी क्षण असतात. ते क्षण आम्ही दोघांनीही पूर्णपणे अनुभवले. आणि त्यांच्या अनमोल आठवणी मनाच्या एका कप्प्यात साठवूनही ठेवल्या.
एका रविवारच्या सकाळी मुलाच्या वडिलांचा फोन आला, ‘आम्हाला मुलगी पसंत आहे परंतु एकदा मुलाला आणि त्याच्या आईला मुलीशी बोलायचं आहे.’ बाबा म्हणाले, ‘ठीक आहे. चालेल आम्हाला. काही हरकत नाही.’ मी विचार केला, ‘मुलाला बोलायचं आहे एकदा हे समजू शकते परंतु त्याच्या आईला माझ्यासोबत काय बोलायचं असेल?’ माझी इंटरव्हय़ू द्यायची तयारी परत सुरू झाली. फरक फक्त इतकाच होता की, हा इंटरव्हय़ू या वेळी टेलिफोनिक होता. मुलगा मुंबईला राहत असल्याने तो फोन कधी करेल हे आधीच ठरलं होतं. ठरल्या वेळी माझ्यासकट घरी सगळेच त्याच्या फोनची वाट बघत बसले होते. त्याचा फोन आला आणि सगळे माझ्या अवतीभोवती गोळा झाले. तो काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी. आता सगळय़ांसमोर मी कसं आणि काय बोलणार होते त्याच्याशी? मी उठून माझ्या खोलीत गेले. आम्ही जवळजवळ दीड तास बोलत होतो. त्याने मला फोन त्याच्याबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल सांगायला आणि अर्थातच माझा निर्णय ऐकायला केला होता. मी खोलीतून बाहेर येईपर्यंत माझ्या घरच्यांचा श्वास अडकला होता. मी बाहेर आले आणि आईला सांगितलं की, मी त्याला होकार दिला. त्या क्षणी सगळय़ांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यांना इतकं आनंदी याआधी मी कधीच पाहिलं नव्हतं. बाबांनी लगेच मुलाच्या वडिलांना फोन केला आणि ही आनंदाची बातमी दिली. यासोबतच आमच्या लग्नाच्या बोलणीला सुरुवात झाली.
हे सगळं सुरू असतानाच माझ्या मनात हा प्रश्न होता की त्याच्या आईला माझ्यासोबत काय बोलायचं असेल? या विचारांचं चक्र माझ्या डोक्यात सुरूच होतं. तोच त्यांचा फोन आला. त्यांनी मला त्यांच्या घरचे सणवार आणि त्यांच्या घरच्या पद्धतींबद्दल माहिती करून द्यायला फोन केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, ‘जी नवी मुलगी या घरात येणार आहे तिला या घरातल्या पद्धतींची कल्पना असायला हवी जेणेकरून तिला अ‍ॅडजेस्ट व्हायला त्रास होणार नाही.’ त्यांचं बोलणं झाल्यावर त्यांनी मला विचारलं, ‘तुला काही सांगायचं असेल तर सांग.’ मला सांगायचं तर होतंच पण सांगू की नको या द्विधा मन:स्थितीत मी अडकले होते. मनाला हे ठाऊक होतं की कोणत्याही नवीन नात्याची सुरुवात खोटं बोलून करायची नसते. मी ठरवलं. त्यांना सगळं खरं खरं सांगायचं. मी म्हणाले, ‘ मला थोडं सांगायचं आहे.’ त्या म्हणाल्या, ‘बोल ना.’ परिणामांची चिंता न करता मग मी त्यांना सांगितलं, ‘मला स्वयंपाक करता येत नाही, पोळ्या येत नाहीत, भाज्या एक-दोन मोजक्याच येतात. पुरणाची पोळी तर अजिबातच येत नाही.’ मला वाटलं होतं त्या नाराज होतील पण त्या हसल्या आणि म्हणाल्या, ‘अगं ती काही मोठी गोष्ट नाही. मी पण स्वयंपाक लग्नानंतरच शिकले. तुझी शिकायची इच्छा आहे ना? मग येईल सगळं हळूहळू.’ त्यांची इतकी साधी प्रतिक्रिया असेल, असं मला वाटलचं नव्हतं. त्यांनी मला आईसारखंच समजून घेतल्यासारखं वाटलं. या नवीन नात्याला सामोरं जायला मी हळूहळू तयार होतं होते.
लवकरच आमची एंगेजमेंट झाली, लग्नाची तारीख निघाली. माझी आणि अनुपमची एकमेकांसोबत बोलायला सुरुवातही झाली. असं म्हणतात की, एंगेजमेंट आणि लग्न यांच्यामधले क्षण हे सोनेरी क्षण असतात. ते क्षण आम्ही दोघांनीही पूर्णपणे अनुभवले. आणि त्यांच्या अनमोल आठवणी मनाच्या एका कप्प्यात साठवूनही ठेवल्या. अनुपमसोबत बोलताना वेळ कसा जायचा कळायचंच नाही. फार कमी वेळात तो माझा चांगला मित्र झाला. त्याच्याशी बोलणं, त्याच्यासोबत गोष्टी शेअर करणं मला आवडायला लागलं. मी त्याच्यावर स्वत:पेक्षाही जास्त विश्वास ठेवायला लागले. माझ्या आयुष्यातली एकूण एक गोष्ट मी त्याला सांगितली. अगदी मला आवडणाऱ्या मुलापासून ते मला प्रपोज करणाऱ्या मुलांपर्यंत सगळं. त्यानेही कधीच मनात अढी धरून ठेवली नाही. तोही माझ्यासोबत तितक्याच मोकळेपणाने बोलत होता. या सगळय़ात कधी मी त्याच्या प्रेमात पडले मला कळलचं नाही. पण त्या वेळी तो मला त्याची चांगली मत्रीणच समजत होता. त्याला माझी काळजी होती, माझ्यासाठी वेळ होता, माझ्या सुखदु:खात तो सहभागी होता, पण तो माझ्यावर प्रेम करत नव्हता. त्याचं म्हणणं होतं की, प्रेम इतक्या लवकर होत नाही कुणावर. ते हळूहळू सहवासानेच होतं. त्याचं म्हणणं बरोबर असेलही कदाचित, परंतु माझ्या आयुष्यातला तो पहिलाच माणूस होता, ज्याच्यावर मी जिवापाड प्रेम केलं. आणि माझा हा विश्वास होता की कधी ना कधी तो पण माझ्यावर प्रेम करायला लागेल.
एकमेकांसोबत बोलून आम्हाला या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आली होती की, आम्हा दोघांच्या घरच्या वातावरणात फार मोठा फरक आहे. आमच्या आवडीनिवडी, राहण्याच्या पद्धती सगळंच अगदी वेगळं आहे. मला जी गोष्ट आवडायची नेमकी तीच त्याला आवडत नव्हती. आम्हाला एकमेकांची मतं कधीच पटायची नाहीत. त्यावरून बरेचदा आमचे वादही झाले. मग आम्ही ठरवलं की एकमेकांना बदलण्यापेक्षा आधी स्वत:लाच थोडं बदलावं. त्यानंतर हळूहळू आपोआपच आमचे मतभेद दूर होऊ लागले. आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजून घ्यायला लागलो.
याचदरम्यान मी माझ्या सासूबाईंच्या सतत संपर्कात होते. त्यांचं आणि माझं नातं अगदी आई-मुलीच्या नात्यासारखं झालं. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की, ‘आपल्या दोघींमध्ये कधीच कुणा तिसऱ्याला आणायचं नाही, तुझ्याबद्दल मला काही वाटलं तर मी तुला सांगीन आणि माझ्याबद्दल तुला काही वाटलं तर तू नि:संकोचपणे मला सांगायचंस.’ मी अगदी तसंच केलं. आम्ही दोघी आई-मुलीसोबतच चांगल्या मत्रिणीही झालो.
आमच्या लग्नाचे दिवस हळूहळू जवळ येत होते तशी मी अनुपममध्ये अधिकाधिक गुंतत चालले होते. तो मुंबईला असल्याने आमची भेट या काळात फक्त एकदाच झाली. दिवाळीच्या निमित्ताने तो नागपूरला आला. मी आणि आई-बाबा त्या वेळी नागपूरला गेलो. आमच्या एंगेजमेंटनंतर आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना भेटलो त्यामुळे साहजिकच दोघांनाही वाटत होतं की थोडा वेळ तरी एकांतात घालवावा. आमच्या घरच्यांनी कदाचित आमच्या मनाची अवस्था जाणली आणि आम्हाला बाहेर फिरायला पाठवलं. आम्ही दोघं टू व्हीलरवर बाहेर पडलो. दोघांमध्ये थोडं अंतर ठेवून मी त्याच्या मागे बसले. तो मला बरेचदा म्हणाला, ‘तू आरामात बस ना.’ मला जाणवत होतं की त्याची अपेक्षा होती मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसावं. पण माझी िहमत होत नव्हती. आम्ही सीसीडीमध्ये गेलो, इकडेतिकडे फिरलो, बराच वेळ गप्पा केल्या आणि मग घरी यायला निघालो. घरी परतताना मी फार िहमत करून त्याच्या खांदय़ावर हात ठेवला. मी हात ठेवल्या ठेवल्या त्याने गाडी थांबवली. माझा हात पकडला आणि मला म्हणाला, ‘अवनी आय लव्ह यू.’ इतके दिवस मी जे ऐकायची वाट बघत होते ते माझ्या होणाऱ्या नवऱ्याने नागपूरच्या एका नाल्यावर पहिल्यांदा मला म्हटलं. आम्ही इतक्या ठिकाणी फिरलो पण मनातलं प्रेम व्यक्त करायला त्याने नालाच का निवडला हे मला अजूनही कळलं नाही. त्याचा स्वभाव असाच सर्वापेक्षा वेगळा, मनातले भाव व्यक्त करायला त्याला कधीच कुठल्या वातावरणाची गरज भासली नाही. त्याचं मन अगदी स्वच्छ होतं आणि म्हणूनच मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलं.
आमचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. आम्ही दोघं फिरायला केरळला गेलो. या चार-पाच दिवसांत आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो. आमच्या दोघांचंच वेगळं असं जग निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. आम्हाला परस्परांबद्दल प्रेम होतं, आदर होता परंतु आपल्या वागण्याने समोरच्याचं मन दुखावलं जाऊ नये ही भीती पण होती. आमचे स्वभाव अगदी भिन्न असले तरी आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा सतत प्रयत्न करत होतो. कारण यापुढील संपूर्ण आयुष्य आम्हाला सोबत आनंदाने जगायचं होतं. आमच्यातले दोष बाजूला सारून एकमेकांचा हात घट्ट पकडून आम्ही आमच्या नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली.
लग्न करून मी आणि अनुपम मुंबईला राहणार होतो. सासऱ्यांची नागपूरला नोकरी असल्यामुळे ते दोघं तिथेच राहणार होते. आता समोर येणारा प्रसंग माझ्यासाठी फार अवघड होता. कारण मुंबईला आम्ही दोघंच राहणार होतो आणि घरकामातलं, स्वयंपाकातलं मला काहीच येत नव्हतं. यापुढे मी कसं मॅनेज करणार होते माझं मलाच ठाऊक नव्हतं.
आम्ही मुंबईला पोहोचलो तर घर सासूबाईंनी अगोदरच सेट करून ठेवलं होतं. माझ्या या गृहिणीच्या नव्या भूमिकेत अनुपमबरोबरच माझा सगळय़ात मोठा आधार होत्या माझ्या सासूबाई. ‘तुला हे येत नाही ते येत नाही,’ अशा प्रकारचं कुजकं बोलून त्यांनी मला कधीच कमी लेखलं नाही. उलट प्रत्येक वेळी त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. मग ते मला स्वयंपाक शिकवताना असो, संसाराच्या जबाबदाऱ्या समजावून सांगताना असो, माझं आणि अनुपमचं भांडण झाल्यावर आम्हा दोघांनाही प्रेमाने, प्रसंगी रागावून योग्य सल्ला देताना असो किंवा लोकांनी मला मारलेल्या टोमण्यांना खडसावून प्रत्त्युत्तर देताना असो. भाजीला फोडणी कशी द्यायची इथपासून ते नवऱ्याला शिस्त कशी लावायची इथपर्यंत सगळं त्यांनी मला फोनवर शिकवलं. जेव्हा जेव्हा त्यांना शक्य व्हायचं तेव्हा तेव्हा त्या आणि सासरे आमच्या जवळ येऊन राहायचे. माझ्या सासू-सासऱ्यांनी कधीच मला माझ्या आई-वडिलांची कमतरता भासू दिली नाही. माझ्यासारख्या मनस्वी मुलीला एक जबाबदार गृहिणी बनवण्यात माझ्या सासू- सासऱ्यांचा आणि अनुपमचा खूप मोठा वाटा आहे.
लोक म्हणतात की मुलीचं लग्न झालं की तिचं आयुष्यच बदलून जातं. नवरा, सासू-सासरे, मुलं, नातेवाईक यांच्यासाठी जगता जगता ती स्वत:चं अस्तित्वच विसरून जाते. परंतु ज्या घरात कुठल्याही प्रसंगी सतत सोबत असलेला अनुपमसारखा नवरा, आपल्या सुनेला आईच्या मायेने कुशीत घेऊन सगळे अपराध पोटात घालणारी सासू आणि वडिलांसारखे पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे सासरे असतील त्या घरात येणारी मुलगी ही नेहमी मुलगीच असते. सून कधीच होत नाही आणि हे मी पूर्णपणे अनुभवलं गोखलेंच्या घरात.
अ‍ॅरेंज मॅरेज असलं तरी आमचं लग्न वेगळं आहे. वरून चारचौघांसारखंच वाटत असलं तरी ते इतरांपेक्षा निराळं आहे. मी आज हे ठामपणे सांगू शकते, कारण इतर नवऱ्यांसारखा माझा नवरा त्याची मतं माझ्यावर लादत नाही, सासू-सुनेची त्रासदायक भांडण होत नाहीत, आमच्या घरात मला माझं असं स्थान आहे, स्वत:चं अस्तित्व विसरून जगण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं असं एक अस्तित्व निर्माण करून जगावं यावरच सगळय़ांचा विश्वास आहे, सगळय़ांच्याच मनात एकमेकांसाठी भरपूर प्रेम आहे, आदर आहे. माझ्या लग्नाचं वेगळेपण माझ्या घरातल्या माणसांमुळे आहे. आणि म्हणूनच माझ्या लग्नाची गोष्ट सर्वापेक्षा वेगळी आहे.

No comments:

Post a Comment