पंगत ते बुफे व्हाया लग्न मंडप
द्वारकानाथ संझगिरी
मुंबईतल्या लग्नाचा थाटमाट, स्टाइल मी गेल्या कित्येक वर्षांत बदलताना पाहिली आहे. तसंच वयोमानाप्रमाणे लग्न एन्जॉय करण्याची वृत्तीसुद्धा बदलत जाते. आठवणींच्या पायऱ्यांवरून खाली उतरून तळाला गेल्यावर मला बालपणापासून पाहिलेली लग्नं आठवतात.
काही दिवस माझे लग्नात हजेरी लावण्यात जातायत. लग्न या विषयावर सर्व भाषांमध्ये शेकडो विनोद आहेत. लग्न करणं म्हणजे पारतंत्र्य स्वीकारणं, बंदिवास स्वीकारणं हे वारंवार बोललं जातं. परवा एका कार्यक्रमात मीसुद्धा बोलून गेलो- ‘सर डॉन ब्रॅडमन हा महानतम फलंदाज का, तर त्याने आयुष्यात एकदा केलेली चूक पुन्हा केली नाही. लग्नसुद्धा एकदाच केलं.’ लोक हसले. पण तरीही माणसं लग्न करतात. एक घटस्फोट झाला तर पुन्हा करतात. किशोरकुमारने तर चार वेळा केलं. त्यातलं, योगिता बालीबरोबरचं त्याचं लग्न हे मधुबालाच्या मृत्यूमुळे झालेली ‘व्हॅकन्सी’ भरण्यासाठी केलेलं लग्न होतं. ते महिन्याभरात मोडलं. पण त्याने पुन्हा लीना चंदावरकरबरोबर लग्न केलंच. एलिझाबेथ टेलरची लग्नं तर सुप्रसिद्ध आहेत. एका अतिशय सुप्रसिद्ध पियानिस्टची मुलाखत एकदा बीबीसीवर सुरू होती आणि त्याला प्रश्न विचारला गेला की, ‘तू पोटापाण्यासाठी काय करतोस?’ तो टिपिकल ब्रिटिश टंग इन चिक स्टाइलमध्ये म्हणाला, ‘‘मी एलिझाबेथ टेलरच्या लग्नात पियानो वाजवतो.’’ सध्या लिव्ह इन रिलेशनशिपचं वारं थोडंफार सुटलेलं असलं आणि लग्नाच्या झाडावरची चार पानं गळली तरी नवी पालवी फुटतेच.
मुंबईतल्या लग्नाचा थाटमाट, स्टाइल मी गेल्या कित्येक वर्षांत बदलताना पाहिली आहे. तसंच वयोमानाप्रमाणे लग्न एन्जॉय करण्याची वृत्तीसुद्धा बदलत जाते. आठवणींच्या पायऱ्यांवरून खाली उतरून तळाला गेल्यावर मला बालपणापासून पाहिलेली लग्न आठवतात. तेव्हा दोन दिवस आधीपासून नातलग मंडळी जमत असत. भेंडय़ा, उखाणे, पत्ते वगैरे गोष्टींना ऊत यायचा. त्यावेळी चुलत, आते, मावस, मामे भावंडं वगैरे एका घट्ट कौटुंबिक धाग्याने जोडलेली असायची. फारसे कुणी परदेशात वगैरे नसत. एकत्रित कुटुंब पद्धत कोसळलेली नव्हती. पण शेवटच्या टप्प्यावर होती. लहानपणी लग्न हा माझ्यासाठी मोठ्ठा इव्हेंट असायचा. अत्यंत आनंददायी अदा! कारण अभ्यासाला आणि शाळेला सुट्टी, सर्व भावंडं जमली की खेळ, धमाल वगैरेला ऊत यायचा. लग्नाच्या निमित्ताने नवे कपडे, बूट वगैरे, गोड पदार्थाची लयलूट आणि आईस्क्रीम! त्या वयात लग्न आणि स्वर्ग हे माझ्यासाठी समानार्थी शब्द होते. त्यावेळच्या जेवणावळीची धमाल वेगळीच होती. एकत्र पंगत, जबरदस्त आग्रह, साजूक तुपाचा घमघमाट, पंचामृत, मसालेभात, जिलब्या वगैरे आठवलं की त्या क्षणी जठराग्नी भडकतो. सर्वसाधारणपणे त्यावेळच्या लग्नात गोड पदार्थ हा जिलेबी असायचा. वधूपक्षाचा खिसा गरम असेल तर मग श्रीखंड किंवा आंब्याचा मोसम असेल तर आम्रखंड. आमरस वगैरे! वधूपक्ष ‘श्रीमंत’ असेल तर बासुंदी! वधूपक्ष त्या काळात बऱ्याचदा सर्व खर्च करायचा, म्हणून त्यांच्यावर बरंच अवलंबून असायचं. नको तेवढा आग्रह व्हायचा आणि मंडळीसुद्धा नको तेवढी खायची. तीस जिलब्या, पन्नास जिलब्या अशी स्पर्धा लागायची. ‘डाएट’ हा शब्द अस्तित्वात असला तरी त्याला माहात्म्य प्राप्त झालेलं नव्हतं. त्या काळातली मंडळी डाएटचा अर्थ ‘डाय इटिंग’ असाच घेत. पोट सुटलेली मंडळी ही ‘सुखवस्तू’ मानली जात. वाढप्यांबरोबर खास आग्रह करणारी ‘घरची’ मंडळी असत. वरपक्ष, वधूपक्षाच्या खिशाच्या जोरावर जोरदार आग्रह करत असे. आग्रह अर्थात जिलेबी-श्रीखंड, मसालेभात, भजी वगैरे. वैद्यकशास्त्र ‘धोकादायक’ मानतं अशा पदार्थाची. त्यावेळी अनेकांना आपल्याला मधुमेह किंवा कोलेस्टेरॉल आहे हे ठाऊकही नसायचं. अज्ञानातल्या सुखात ते मस्तपैकी डुंबायचे. जेवणाच्या पंक्तीची सुरुवात बऱ्याचदा श्लोकाने व्हायची. त्यावेळी मध्यमवर्गीयांना मराठीच काय, संस्कृतही यायचं. अशाच एका लग्नातला एक प्रसंग मी विसरणार नाही. ‘मोस्ट एम्बॅरसिंग मोमेंट’ म्हणावा असा प्रसंग माझ्या एका नातेवाईकाच्या बाबतीत घडला. लग्नातली जेवणाची पंगत लागली. कुणीतरी धीरगंभीर आवाजात ‘वदनी कवळ घेता’ सुरू केलं आणि त्याचा शेवट ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ होणार आणि मंडळी पहिला घास घेणार एवढय़ात नगारा वाजावा तसा एक माणूस पादला. आवाजाच्या दिशेने सर्वाच्या नजरा गेल्या. मी त्या माणसाच्या जागी असतो तर सीतेप्रमाणे जमीन दुभंगून मला पोटात घेईल तर बरं होईल असं मला वाटलं असतं. तो माणूस न लाजता म्हणाला, ‘गिरणीचा भोंगा कधी ऐकला नाही का? हे नैसर्गिक आहे. म्हणा पुंडलिक वरदा हारी विठ्ठल..’ आता एम्बॅरस होण्याची वेळ इतरांची होती.
त्यावेळी पहिल्या पंक्तीला ऑफिसात जाणारी आणि घाईत असलेली मंडळी जेवायला बसत. शेवटची पंगत ही अगदी जवळच्या नातेवाईक मित्रांची. जेवणाच्या दृष्टीने पहिली पंगत ही उत्कृष्ट असे. सर्व ताजं, मुबलक वगैरे! विशेषत: ताक किंवा मठ्ठा पहिल्या पंक्तीत उत्तम असे. त्यानंतर ताक किंवा मठ्ठय़ाची डेन्सिटी (घनता) कमी होत जायची. शेवटची खास पंगत सोडली, तर त्या पंगतीआधीच्या पंक्तीत अस्सल ताक आणि पाणी यांचं कॅपिटल शेअरिंग एकोणपन्नास टक्के आणि एक्कावन टक्के असे. कंपनी ‘पाण्याच्या’ ताब्यात असे. त्यामुळे घरचं लग्न असेल तर शेवटची पंगत, नाहीतर पहिली पंगत जेवणास उत्तम हा माझा सिद्धांत होता. पण त्याच वेळी अवास्तव आग्रहामुळे मी अन्नाची प्रचंड नासाडी पाहिलीए. जे ताटात टाकलं जाई त्यावर अर्धपोटी जनतेतली कुटुंबच्या कुटुंब जेवली असती आणि त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला असता. ही जाणीव पुढे पुढे व्हायला लागली.
सकाळच्या जेवणाच्या वेळी उखाणे वगैरे प्रकार चाले. आजही चालतो. आता मॉडर्न उखाणे असतात. त्याची पुस्तकंही मिळतात. पण, आजचं लाजणं खोटं असतं. त्यावेळचं लाजणं खरंच लाजणं असायचं. जुळवलेल्या लग्नात आणि त्यात लग्न पटकन ठरलं असेल तर एकमेकांना जाणून घ्यायला वेळही मिळायचा नाही. वधूसह वधूपक्ष सतत दबावाखाली वावरताना दिसायचा.
संध्याकाळच्या रिसेप्शनला मुली मेकअप करायच्या, पण तो चार तासांचा प्रकार नसायचा. रिसेप्शन वेळेवर सुरू व्हायचं. नवरा सासऱ्याने दिलेल्या पैशाने सूट शिवून रिसेप्शनला घालायचा. फोटोग्राफर बऱ्याचदा मुलीकडचा असायचा. मला आठवतंय, माझ्या एका मित्राच्या लग्नात फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावर हसूच नव्हतं. शेवटी त्या मित्राचा भाऊ जोराने म्हणाला, ‘‘अरे तुला हसायला हरकत नाही. फोटोचा खर्च तिकडून आहे.’’ तो हसलाच, पण असं म्हणतात की, त्याचे सासरेसुद्धा त्याचं लग्न जमल्यापासून पहिल्यांदा हसले. रिसेप्शनला जेवण ही पद्धत नव्हती. आर्थिक कुवतीप्रमाणे रिसेप्शनला मसाला दूध, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम असे. लग्नात कसाटा आईस्क्रीम असणं हे उच्चभ्रूपणाचं व्यवच्छेदक वगैरे म्हणतात तसं लक्षण होतं. लहानपणी लग्नात सहा-सात कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या संपवणे किंवा सहा-सात आईस्क्रीम खाणे ही रोमहर्षकता मानली जायची. एकदा नववीत वगैरे असताना मी आणि माझा वर्गमित्र मोहन वैद्य शिवाजी पार्कला फिरत होतो. स्काऊट पॅव्हेलियनमध्ये कुठलंसं लग्न सुरू होतं. बाहेरून कसाटा आईस्क्रीम कापताना माणसं दिसली. दोन फलंदाज एकेरी धाव चोरताना फक्त एकमेकांकडे बघतात आणि नजरेने बोलतात. तसं आम्ही पाहिलं, नजरेने बोललो आणि रिसेप्शनमध्ये शिरलो. एक आईस्क्रीम संपल्यावर दुसऱ्या आईस्क्रीमकडे मोर्चा वळवताना लग्नातल्या मंडळींना ‘आम्ही घुसल्याचा’ संशय आला, असं आम्हाला वाटलं. माझी पाचावर धारण बसली. मोहन वैद्य शाळेपासूनच नाटकात कामं करायचा. तो उठला आणि घरचाच असल्याप्रमाणे आईस्क्रीम घेऊन येणाऱ्याला ‘गाईड’ करायला लागला. ‘इथे द्या. अजून भाऊसाहेबांना मिळालेलं नाही. मावशी, आईस्क्रीम खाल्लंत? आईस्क्रीम घेतल्याशिवाय जायचं नाही.’ वगैरे वगैरे! मला नेहमी वाटतं, मोहन वैद्य एका विशिष्ट काळानंतर नाटकापासून दूर गेला, तेव्हा मराठी नाटय़भूमी एका चांगल्या नटाला आणि कदाचित नाटय़लेखनाला पारखी झाली. नववीत असताना दुसऱ्याच्या रिसेप्शनमध्ये शिरून तिथल्या तिथे प्रसंग लिहून इन अॅक्ट करणं हे केवढं कसब! त्या दिवशी खाल्लेली पाच कसाटा आइस्क्रीम ही मोहनच्या कसबाचं बक्षीस होतं. मला आइस्क्रीमवरून आणखीन एक प्रसंग आठवतो. एका नात्यातल्या रिसेप्शनला दिलेल्या नऊच्या वेळेनंतर काही मंडळी आली. आइस जवळजवळ संपलं होते. कोल्ड्रिंकवाला दूर होता. एका नातेवाईकाने भूमिका घेतली की साडेनऊ झाले आहेत. रिसेप्शनची वेळ संपलीए. त्यामुळे आपण त्यांना काही देणं लागत नाही. मी त्याच्या हातातल्या मोठय़ा प्रेझेंटकडे पाहून म्हटलं, ‘ते देणंही लागत नाही.’ असं त्यांनी म्हटलं तर. शेवटी आइस्क्रीमचे दोन तुकडे जमा केले आणि मी दोघांना दिले. एकाने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त म्हटलं, ‘टेस्टला दिले आहेत? आमच्याकडे टेस्टलाही यापेक्षा जास्त देतात.’ माझा चेहरा किती पडला असावा. उचलायला खूपच कष्ट झाले. कॉलेजात एका सुंदर मुलीने नकार दिल्यावरही इतका कधी पडला नव्हता.
‘आहेर’ हा लग्नातला त्यावेळी महत्त्वाचा भाग होता. तो नीट सांभाळून ठेवून त्याची नोंद करण्यासाठी एक खास माणूस ठेवलेला असायचा. तो अत्यंत विश्वासातला माणूस असायचा. आमच्या संझगिरी घराण्यातलं लग्न असेल, तर माझे काका, ज्यांना आम्ही प्रेमाने पदूकाका म्हणायचो, ते आहेर लिहायला असायचे. त्यांच्या लग्नात फक्त आहेर लिहिला नाही. त्यांची तशी तयारी असती तर त्यांच्या लग्नात आहेर स्वीकारल्यानंतर त्यांनी सहज लिहिलासुद्धा असता. दुसऱ्या दिवशी पाकीट आणि वस्तूंची चांदी काढणं हा आनंददायी प्रसंग वाटायचा. घेणं कधी आनंददायी नसतं. कधी कधी आहेराच्या रकमेवरून ‘प्रेम’ ठरवलं जायचं. ते यातना देणारं असायचं. पुढे सामाजिक जाणीव झाल्यावर आहेर हा सामाजिक कर वाटायचा.
मी वयात आल्यानंतर लग्न फारसं बदललं नव्हतं. फक्त गिरगावातले लक्ष्मीबाग, विष्णूबाग या पलीकडे आम्हा सारस्वतांची लग्न व्हायला लागली. माझी दृष्टी थोडी बदलली. ती लग्नातल्या सुंदर मुलीवर खिळायची. लग्नात लग्न जुळवून टाकायचा हिशेब माझा काही जुळला नाही. त्यावेळी सुंदर मुलगी आवडली की, प्रेम आणि लग्न या दोन पायऱ्या पुढे असत. आता आवडली की, मैत्री, मग मजा, मग इतरत्र स्कोप नसेल तर प्रेम आणि पुढे पटलं तर लग्न इतक्या पायऱ्या आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत लग्न बदललं. आता हॉल पुरत नाहीत. त्यामुळे मैदानं आली. आता डेकोरेशन्स डोळे दिपवतात. संध्याकाळचं आइस्क्रीम जाऊन बुफे आला. बुफे प्रांताच्या सीमा ओलांडतोच, पण बऱ्याचदा देशाच्या सीमा ओलांडतो. मराठी माणूस आता पंचतारांकित हॉटेलातही रिसेप्शन ठेवतो. माझ्या लहानपणी लग्नात बॅन्ड असायचा. आता लग्नापूर्वी संगीत असतं. आता लग्न हा लाखांचा इव्हेंट झालाय. ओलावा किंचित कमी होऊन तो शोकेस आयटेम झालाय. या लग्नात मी पंचामृत, मसालेभात, ते प्रेमाने वाढणं नक्कीच मिस करतो. पण एक चांगली गोष्ट झालीए. आहेर नावाचा सामाजिक जिझिया कर आता गेलाय. निदान रिसेप्शनमधून! नातेवाईक मंडळी आहेर करतात, पण एक संस्कार म्हणून!
आज लग्नाला जाताना मी पदार्थ शोधत नसतो. सुंदर मुली शोधत नसतो. (बायकोचा विश्वास बसणं कठीण आहे. पण कधीतरी मला असत्य, सत्य सांगितल्याप्रमाणे सांगायलाच हवं.). मी हजेरी लावतो आणि वधू-वराच्या आनंदात सामील होतो.
No comments:
Post a Comment