Wednesday, January 28, 2015

Yanda Kartavya aahe ka?




यंदा कर्तव्य आहे का? मुला मुलींच्या आईवडिलांना विचारला जाणारा हमखास प्रश्न. पण समजा असेल तर मग तुम्ही लग्न करणार तरी कसं.. थाटामाटात की बजेटमध्ये? लग्नाच्या बदलत्या ट्रेंडवर टाकलेला एक दृष्टीक्षेप.
साधारण १५ ते १६ वर्षांपूर्वी आलेल्या हम आपके है कौन या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच वळणावर आणले. कुणी हा चित्रपट पाहून लग्नाची कॅसेट आहे असं म्हटलं तर कुणी माधुरी आणि सलमानच्या केमिस्ट्रीवर मनापासून चर्चा केली. असो, या चित्रपटातून एक मात्र नक्कीच शिकलो ते म्हणजे लग्न कसं करावं. चित्रपट पाहिल्यानंतर लग्न करण्याच्या पद्धतीत आपसूक बदल होऊ लागला. लग्न हा केवळ कुटुंबाचा सोहळा नाही तर त्याला इव्हेंटच स्वरूप आलं. केवळ प्रतिष्ठा म्हणून नाही तर चर्चा म्हणून लग्नाचा सोहळा अधिक दिमाखदार होऊ लागला. आज तर लग्न म्हणजे एक इव्हेंट झालेला आहे. जिथे घरातील मोठय़ा आजी, काकी, मामी सरबराई करण्यासाठी पुढे पुढे करत नाहीत. तर काम करण्यासाठी असतो वेडिंग ऑर्गनायझर. एखादं नाव इंग्रजाळलेलं असलं तर तसं वजनही त्या नावात असतं. अर्थात वेडिंग ऑर्गयनायझरचं काम केवळ नावापुरतं नाही तर त्याला ते सिद्ध करूनही दाखवावं लागतं. नुकत्याच आलेल्या बँड बाजा बाराती या चित्रपटाने लग्नाचं आयोजन कसं करू शकतो आणि त्याकरता काय करावं लागतं हेही उत्तमपणे दाखवलंय. पूर्वी लग्न म्हटलं की किमान दोन घरात देण्याघेण्यावरून कुरबुरी कटकटी यांचं सावट लग्नावरही उमटायचं. वधूचा पिता चेहऱ्यावरून कसा दिसतोय आणि तो कितपत आठया पाडून आहे यावर त्या लग्नाचा नूर कळायचा. आज मात्र ही दु:खाची सर्व जळमटंच दूर सारली गेली आहेत. वधू पिता अगदी ऐटीने लग्नात मिरवत असतो. नवरीच्या आईची लगबग इतकी कमी झालीय की केवळ स्वतच्या ग्रुमिंगकडे लक्ष देऊ लागलीए. खास नवऱ्या मुलाची आई आणि नवरीची आई मंडपातल्या गडबडीकडे न बघता आपल्या मेकअपकडे अधिक लक्ष देऊ लागल्यात. मॅचिंगचा जमाना तर आता कालबाह्य झालाय. मिक्स अ‍ॅण्ड मॅचलाच कसं ग्लॅमर मिळवून द्यायचं याकरता त्यांच्याकरता स्पेशली एक डिझायनर आणला जाऊ लागलाय.
लग्नाच्या बदलत्या ट्रेंडबद्दल बोलताना गिरीश थापर म्हणतात, चित्रपटांनी लग्नाच्या ट्रेंडमध्ये मोठय़ा प्रमाणात चेंज आणला. गेली २५ वर्षे ते या इव्हेंट ऑर्गनायझेशनमध्ये आहेत. थापर घराण्याची ही चौथी पिढी. खासकरून सेलिब्रिटींची लग्न ऑरगनाईझ करण्यात यांचा हातखंडा आहे. ते म्हणतात, अलीकडे उत्तमोत्तम काय द्यावं आणि कसं करावं याकडे आमचा कल असतो. उत्तम म्हणजे काय तर उंची लग्न करायची. म्हणजे समजा गेल्या महिन्यात आम्ही एखादं लग्न केलं. तर नवीन येणारी पार्टी गेल्या लग्नात काय सुविधा दिल्या हे विचारते आणि त्यापेक्षा चांगलं लग्न व्हायला हवं असं तोंडावर सांगून जातात. आता चांगल्यात चांगलं करायचं म्हणजे बजेटचा प्रश्न येतो. अनेक गोष्टींचे भाव वाढल्याने अगदी वरातीच्या घोडय़ापासून ते बुफेच्या व्हरायटीमध्येही बदल होतो. आज बुफेची व्हरायटी म्हणजे पाय दुखायला लागतील इतपत मोठ्ठी असते. हे सर्व पदार्थ खरंच कुणी खातं का यावर ते म्हणतात. हा प्रश्न प्रतिष्ठेचा असतो. सेलिब्रिटी किंवा राजकारणी यांच्या लग्नात येणारा क्राऊड हा वेगळाच असतो. तो केवळ एका ठराविक कम्युनिटीला समोर ठेवून आलेला नसतो. तर अतिशय भिन्न असलेल्या या क्राऊडला आकर्षण म्हणून भारतातील जवळपास सर्व प्रांतातले स्टॉल लावावे लागतात. याकरता आम्हाला खाण्यामध्येही अनेक नवीन ट्रेंडस् शोधावे लागतात. वेगळ्या पद्धतीचं उत्तम काय देऊ शकतो याचा शोध घ्यावा लागतो. त्याकरता अनेकदा आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमधील शेफची मदत घेतो. एखादा नवीन पदार्थ लग्नात इंट्रोडय़ुस करून चालत नाही तर किमान ७ ते ८ पदार्थ नवीन रेसिपीजचे ठेवावेच लागतात. तरच ते क्लरईटस्ना आवडतात. हे नवीन पदार्थ आमच्याकडून टेस्टिंगला क्लाईंटकडे पाठवले जातात. त्यानंतर या पदार्थाची फायनल पसंती ठरते.
लग्नाआधीचे १५ दिवस तर आम्ही दोन्ही घरांना एक टाईम टेबल देतो. त्यानुसार तिथली कामं कशी व्हावीत हे सर्व आमच्याकडून ठरवलं जातं.
यासंदर्भातील एक विनोदी किस्सा थापर सांगतात, एका नामांकित इंडस्ट्रियलिस्टला पाच वेळा विविध प्रकारच्या भाज्या पाठवण्यात आल्या होत्या. प्रत्येक वेळी त्यांची नापसंती असे. अखेर शेफने यावर एक उपाय केला. त्याने पहिल्या फेरीला पाठवलेल्या ७ भाज्यांचे प्रकार पुन्हा रिपिट केले आणि अखेर त्या भाज्यांना पसंती मिळाली. थापर म्हणतात, क्लाईंट पैसे खर्च करायला तयार असतो तेव्हा आमच्याकडून उत्तम कसं देऊ याचाच विचार अधिक करतो. एखाद्या गोष्टीत तडजोड करणं हे आम्हाला अजिबात परवडणारं नसल्याने आम्ही तडजोडीचा विचारच करू शकत नाही. पण क्लाईंटची आवड निवड नेमकी तुम्ही कशी ठरवता.. या प्रश्नावर अधिक बोलताना ते म्हणतात, मुलांना कुठल्या शाखेत प्रवेश घ्यायचाय हे आपण त्याच्या कम्पॅटीबिलिटी टेस्टवरुन ठरवतो ना तशीच पण एका वेगळ्या प्रकारची टेस्ट आम्ही घेतो. आमच्याकडे काही प्रश्नांची यादी आहे. या यादीमध्ये प्रत्येक प्रश्नाला काही ऑप्शन्स आहेत. हे प्रश्न जो सोडवतो आणि तो कुठल्या ऑप्शनवर अधिक भर देतोय याकडे आमचं लक्ष असतं. अनेकदा प्रत्यक्ष भेटीत क्लाईंटला नेमकं काय हवंय हे मांडता येत नाही. अशा वेळी ही यादी उपयुक्त ठरते. एखाद्या लग्नाच्या मॅनेजमेंटची जबाबदारी नेमकी तुम्ही कशी आखता? लग्न म्हणजे बेसिक काय तर मुला मुलीची पसंती ती झाल्यावर प्रत्येक गोष्ट आमच्याकडून केली जाते. म्हणजे अगदी मुला मुलीने कुठला ड्रेस डिझायनर निवडावा इथपासून. आम्ही ऑप्शन्स सजेस्ट करतो. लग्नाआधी आमचा काही प्लॅन असतो त्यानुसार दोन्ही लग्नघरात आम्ही कामं करवून घेतो. उदा. देवळात जाण्यापासून ते अगदी पत्रिका वाटण्यापर्यंत. या सर्व विविध कामांसाठी आमच्याकडे माणसं नेमलेली असतात. लग्नाआधीचे १५ दिवस तर आम्ही दोन्ही घरांना एक टाईम टेबल देतो. त्यानुसार तिथली कामं होताहेत किंवा ती कशाप्रकारे करवून घ्यायची हे सर्व आमच्याकडून ठरवलं जातं. अनेकदा काही घरांमध्ये गोंधळ हा फार असतो. अशावेळी लग्नाच्या दिवशी उगाच काही गोंधळ उडू नये याकरता त्यांना उत्तम ऑरगनाईज्ड करणं हे आमचं काम असतं. म्हणजे अगदी आदल्या दिवशी कपडेही आम्ही घरी पोहचवतो. लग्नाच्या दिवशी त्या व्यक्तीला फक्त ते कपडे परिधान करून लग्नाला यायचं असतं. मेहंदी, संगीत आणि इतर अनेक प्रकार अलीकडे महाराष्ट्रीय लग्नात डोकावू लागलेत हा नवा बदलता ट्रेंड आहे का.. यावर थापर हसले. अधिक बोलताना ते म्हणतात, पूर्वी महाराष्ट्रीय माणूस लग्नात फारसा खर्च करत नव्हता. पण अलीकडे तोही या सर्व नव्या ट्रेंडस्ना आपलंसं करू लागलाय. अनेकदा तर प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून तो आवाक्याबाहेरचा खर्चही करू लागलाय. अलीकडे बहुतांश मुलं मुली परदेशात शिकण्यासाठी जातात. केवळ भारतात येऊन लग्न करायचा हा त्यांचा मानस असतो. अशा मुलांचे आई वडिल तर मुलांसाठी काय करू आणि काय नको याचाच विचार करतात. मुख्य म्हणजे पूर्वी किमान एका घरात तीन मुलं असायची. त्यानंतर ती संख्या दोनवर आली आता तर एक मुलगा किंवा मुलगी असते. मग तिचं लग्न आपण उत्तम केलं तर चारचौघांमध्ये आपलं नाव होईल या विचारानेही लग्नावर खर्च करण्याची संख्या वाढल्याचं थापर कबूल करतात. ते म्हणतात, लग्नाचा सिझन म्हणजे आम्हाला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. आता हा भाग झाला केवळ लग्नाच्या तयारीचा. याच तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मंडप. गेली १७ वर्षे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे चंद्रकांत मुळीक आता या व्यवसायात अगदी उत्तम सेटल झालेले आहेत. ते म्हणतात, पूर्वी मंडप म्हणजे साध्या कपडय़ाचा किंवा अगदी तलम कपडय़ाचा असायचा. आता मंडपाच्या कपडय़ांमध्येही व्हरायटी आलेली आहे. मंडप म्हणजे केवळ झिरमिळ्या नाहीत. तर त्यालाही डेकोरेशन असायला हवं. बांबू आणि त्याच्यावर लावला जाणारा कपडा हा तलम किंवा साध्या कपडय़ाचा नको तर त्याला प्लॅस्टिकच्या वेली किंवा फुलांचं डेकोरेशन करावं लागतं. मंडपाची कमान कशी असावी याची डिझाईन अनेकदा क्लाईंट सुचवतात. बऱ्याचदा क्लाईंटस्ना मंडपचं डेकोरेशन हे त्यांच्या आवडीप्रमाणे हवं असतं. त्याकरता स्पेशली मंडप डिझाइन करावा लागतो. हा मंडप डिझाइन करताना खर्च हा अनेकदा अव्वाच्यासव्वा वाढतो. या वाढीव किमतीची कल्पना समोरच्या व्यक्तीला द्यावी लागते. काही मंडप बांधण्यासाठी कारागीर वेगळे बोलवावे लागतात त्यांचा खर्च वाढतो. काही मंडपाची उभारणी ही महालासारखी केलेली असते त्यामुळे ती उभारणी केवळ एका दिवसात होत नाही. तर किमान तीन दिवस आधी याकरता काम करावं लागतं. कुठेही लग्नाच्या दिवशी काही गोंधळ उडू नये याची जबाबदारी घ्यावी लागते. अशा अनेक गोष्टी आज मंडपाच्या बाबत बदललेल्या आहेत.
अलीकडे बहुतांश मुलं मुली परदेशात शिकण्यासाठी जातात. केवळ भारतात येऊन लग्न करायचा हा त्यांचा मानस असतो. अशा मुलांचे आई वडिल तर मुलांसाठी काय करू आणि काय नको याचाच विचार करतात.
मंडपाच्या बाबतीतला ट्रेंड आपण पाहिला पण इथे लाईटिंग डेकोरेशनही तितकंच महत्त्वाचं आहे. नरेन पांडे गेली दहा वर्षे खास लाईट सप्लायर्स या व्यवसायात आहेत. मुंबईतील अनेक नामांकित कार्यक्रमाच्या ठिकाणी यांच्या लाईटस्ना डिमांड आहे. पांडे लाईट डेकोरेशन संदर्भात म्हणतात की, अलीकडे चायना मेड वस्तूंना डिमाण्ड फार आहे. यामध्ये लाइटच्या व्हरायटीही अनेक पाहायला मिळतात. डिस्को लाईट आता आऊटडेटेड झाली असून, त्याजागी थीम लाईट आलेली आहे. थीम लाईट म्हणजे प्रत्येक लग्नाची एक थीम ठरलेली असते. या थीमनुसार लाइटिंग करावी लागते. काही लग्नामध्ये लाइटिंग या प्रकाराला खूप अनन्यसाधारण महत्त्व असते. तर काहीजण लाइटिंग हा विषय दुय्यम मानतात. लग्नाच्या मैदानाभोवती किंवा हॉलच्या बाहेर लाईटस्चे कुठले इन्स्टुमेंट असावेत यातही अनेकदा चढाओढ असते. इलेक्ट्रिकल कारंजे तेही लाइटवर चालणारे असे नानाविध प्रकार अलीकडे डिमाण्डेड आहेत.
हे सर्व पाहिल्यावर खूप प्रसिद्ध जाहिरात आठवते.. हम बारातीयों का स्वागत..करेंगे.. आता तुम्ही तुमच्या वऱ्हाडाचं स्वागत कसं करणार आहात? सो लेटस् रेडी फॉर फन..

No comments:

Post a Comment