Wednesday, January 28, 2015

Lagnache Vay

लग्नाची वेगळी गोष्ट - लग्नाचे वय

चार वर्षांपूर्वी गिरगावातल्या त्या चाळीच्या जागी जाण्याचा योग आला. ४० वर्षांपूर्वी या चाळीच्या जागेशी माझी ओळख झाली होती. आज या ठिकाणी पाच-सहा मजल्यांची भव्य इमारत उभी आहे, पण पूर्वी येथे चाळ होती. मुंबईला बदली होऊन आल्यावर दोन-तीन वर्षे मी त्या चाळीत पेइंग गेस्ट म्हणून राहिलो होतो. त्या चाळीत कोकणातल्या आमच्या भागातीलच माणसे राहायची. त्यांच्याकडून अधूनमधून ख्यालीखुशाली कळायची. चार वर्षांपूर्वी एका नातेवाईकाकडे गेलो होतो, तर बंडूकाका निवर्तल्याचे कळले आणि सगळा कालपटच एखाद्या चित्रपटाप्रमाणे समोर उभा राहिला.
बंडूकाका वयाच्या १३-१४व्या वर्षी मुंबईला आले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरीला लागले. त्या चाळीत पेइंग गेस्ट म्हणून राहिले. वयाची चाळिशी उलटली तरीही त्यांचे लग्न झाले नव्हते. कोकणातील घरच्या मंडळींची जबाबदारी, दोन लहान भावांच्या शिक्षणाची व बहिणीच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर होती. या जबाबदारीतून मुक्त झाले, तर लग्नाचे वय उलटून गेलेले. काही थोराड मुलींच्या पत्रिका त्यांच्याकडे आल्या, काहींनी विधवा विवाह करण्याचाही सल्ला दिला, पण बंडूकाकांनी लग्न करण्याचा विचारच सोडून दिलेला होता.
बंडूकाकांनी नोकरी करता करता पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. नोकरीतही बढती मिळाली होती. वागणे, बोलणे मर्यादाशील; सरळ-साधी वागणूक, विनयी व दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, दिसायला नीटस, निरोगी शरीर, स्त्री वर्गाशी आदराची व मर्यादा ठेवून वागण्याची पद्धत. एक सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती असूनही त्यांचा विवाह का होऊ शकला नाही?
काकांची जन्मपत्रिका पाहणाऱ्या एका ज्योतिषाने स्पष्टपणे सांगितले होते की, ‘अजून कमीत कमी २० वर्षे काकांना लग्नयोग नाही. यांचे लग्न त्यांची पंचेचाळिशी उलटल्यानंतर अगदी अनपेक्षितपणे होईल. एक सुस्वभावी, सुंदर अशी तरुण मुलगी आपणहून यांच्या आयुष्यात येणार आहे.’ अनेकांनी त्या ज्योतिष्याची टिंगल करायला सुरुवात केली. त्या वेळी भविष्य लिहिलेला कागदच त्यांनी दिला. त्या कागदावर नोट लिहिली की, हा कागद जपून ठेवा. काकांचे लग्न होईल, त्या वेळी मी हयात असणार नाही, पण लग्नाच्या वेळी या कुडमुडय़ा ज्योतिष्याची तुम्हाला नक्की आठवण होईल. कित्येक वर्षे याची चर्चा सुरू राहिली व ती मुला-मुलींच्या कानावरही पडत असे.
बंडूकाकांना ‘सार्वजनिक काका’ असे गमतीने म्हटले जायचे. सरळ व सुस्वभावी बंडूकाका अडल्यानडल्या वेळी सर्वाच्या मदतीला धावून जायचे. भायखळ्याला जाऊन घाऊक दरात भाजीपाला आणून तो चाळकऱ्यांमध्ये वितरित करणे, वाणसामानाचे वितरण करणे, निरनिराळे उत्सव, दिवाळीचे आकाशकंदील करणे यात त्यांचा पुढाकार असायचाच, पण लहान मुलामुलींमध्ये ते फार रमायचे. मुलांचा अभ्यास घे. त्यांना गोष्टी सांग. परवचा म्हणून घे, त्यांच्या सहली काढ. थोडक्यात, मुलांना जे जे प्रिय अशा गोष्टींमध्ये ते रमून जायचे. अशाच मुलामुलींमध्ये अंजली नावाची मुलगी होती. अगदी लहानपणापासून ती काकांच्या मेळाव्यात दाखल झालेली होती.
अंजली बी.कॉम. होऊन बँकेत नोकरीला लागली. दोन वर्षांनी तिच्या लग्नाच्या खटपटी सुरू झाल्या. चांगली चांगली स्थळे ती नाकारू लागली. तिच्या मनात काय आहे, तिचे कुठे प्रेमप्रकरण आहे का? असे नाना विचार घरच्यांच्या मनात घोळू लागले. तशी तिच्याकडे विचारणाही झाली, पण तिचे उत्तर ठरलेले असे, ‘मला आता लग्न करायचे नाही. जेव्हा लग्न करावेसे वाटेल तेव्हा मी आपणहून सांगेन, पण एक नक्की की, जी व्यक्ती मला पसंत पडेल, त्या व्यक्तीचा जर होकार असेल तर त्याच्याशीच मी लग्न करीन. आणि असं जर घडलं नाही, तर मी आजन्म कुमारिका राहीन, पण घरच्यांना माझे ओझे वाटणार नाही याची काळजी घेईन.’
सर्वाचीच बोलती बंद झाली, पण काळजी मात्र वाढली. तिच्या या निर्णयामुळे तिच्या आईवडिलांना नेमके काय करावे, हे सुचत नव्हते. या मुलीला लग्नाचा तगादा लावला आणि तिने काही बरेवाईट करून घेतले तर? बंडूकाकांची भेट घेऊन त्यांनी अंजलीला समजावून सांगावे अशी गळ त्यांनी घातली. बंडूकाकाही विचारात पडले, पण ‘मी पाहतो प्रयत्न करून’ असे मोघम उत्तर त्यांनी दिले. पण तिच्या आई-वडिलांना स्पष्ट कल्पना दिली की, या बाबतीत इथे तिच्याशी बोलणे अवघड होईल. आम्ही चौपाटीवर जाऊन बोललो तर चालणार असेल, तर मी बोलू शकेन.
तिच्या आई-वडिलांचा होकार मिळाला.
रविवारची सकाळ उजाडली. अंजलीला पाहिल्यावर बंडूकाका तिला म्हणाले, ‘आज संध्याकाळी एक-दोन तासांचा मोकळा वेळ तुला असेल, तर मला काही सांगायचेय व त्यासाठी आपण चौपाटीवर जाऊ.’
थोडासा विचार करून अंजलीने होकार दिला.
रविवारी संध्याकाळी बंडूकाका व अंजली चौपाटीवर गेली. भेळ खाता-खाता इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अंजली म्हणाली, ‘काका, मी लग्न करावे हे मला पटविण्यासाठीच मला तुम्ही इथे बोलावलेत ना?’
‘हो. अगदी बरोबर, तुला जर कसली भीती वाटत असेल, कुणी तरुण मनात भरला असेल, तू त्याच्याशी लग्न करू इच्छित असशील, तर स्पष्टपणे सांग. तुला समजून घेण्याचा मी प्रयत्न करीन,’ बंडूकाका म्हणाले.
‘काका, आत्तापर्यंत मी कधीच, बेजबाबदारपणे वागलेली नाही, याची तुम्हालाही माहिती आहे. मी आता स्वतंत्रपणे विचार करू शकते. योग्य जोडीदार म्हणजे कोण? त्याचा वयाशी संबंध असलाच पाहिजे का? काही दिवसांत झालेल्या ओळखीने लग्नासाठी दिलेला होकार वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी नेहमीच योग्य ठरतो का? त्यापेक्षा ज्या व्यक्तीला आपण बरीच वर्षे ओळखतो, ज्याचा स्वभाव, वागण्याची पद्धत आपल्याला निश्चितपणे माहिती आहे, अशी व्यक्ती लग्नाचे वय उलटून गेलेली असली तरी एखाद्या तरुणीला आयुष्याचा जोडीदार म्हणून ती व्यक्ती अयोग्य वाटली नाही, तर ते चूक ठरेल काय?’
अंजलीने आपला मनोदय व्यक्त केला.
थोडा वेळ स्तब्ध राहून बंडूकाका म्हणाले, ‘तुझे बोलणे सर्वस्वी चुकीचे आहे, असे जरी म्हणता आले नाही, तरी लोकरीतीला ते धरून होणार नाही. विजोड लग्न फार काळ टिकू शकेल असेही सांगता येत नाही. शिवाय अशा लग्नव्यवहारातून कटुता, गैरसमज, असमाधान निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असते. कारणपरत्वे, प्रौढ विवाह, विजोड विवाह, विधवा विवाहही होतात, पण ते गरजेपोटी. आजकालच्या जमान्यात योग्य वेळी तरुण-तरुणींनी विवाह करणे हे सर्वमान्य आहे व ते योग्यही ठरते. दुसरे असे की, तुमच्यासारख्या मुलींना नाही म्हटले तरी पूर्वीपेक्षा स्वातंत्र्यही अधिक आहे. शाळा-कॉलेजात जाताना, नोकरी करताना तरुण-तरुणींना एकत्रपणे वावरण्याची संधीही मिळते. एकत्रितपणे वावरल्यामुळे परस्पर ओळख वाढते. यातूनच प्रेमविवाह, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहही होतात. बदलत्या परिस्थितीनुसार त्यात काही गैर आहे, असेही नव्हे. पण अनेक वेळा बाह्य़ स्वरूपावरून प्रेमसंबंध जुळतात. कधी अनुमतीने, कधी पळून जाऊनही लग्ने होतात. नवलाईचे नऊ दिवस संपले, एक मूल झाले की खऱ्या संसाराला सुरुवात होते आणि येथून कसोटीच्या क्षणांचीही सुरुवात होते. स्वभाव जुळत नसेल, बारीकसारीक कारणांवरून मतभिन्नता झाली की भांडणांना सुरुवात होते. भांडय़ाला भांडे लागून आवाज येतो, हे जरी खरे असले तरी, सततच्या भांडय़ांच्या आवाजाने भांडणे होणे केव्हाही अहितकारकच. आपल्या संस्कृतीत पत्रिका पाहून, घराणे पाहून जे पारंपरिक पद्धतीने विवाह होतात ते बऱ्याचशा प्रमाणात टिकतात, असा आजवरचा अनुभव आहे, त्यामुळे तू तुझा विचार करून आई-वडिलांच्या इच्छेलाही मान देऊ शकतेस. तुला अनुरूप असा कोणी भेटला असेल व त्याच्याशीच तुला विवाह करायचा असेल, तर तसे स्पष्ट सांग. मला सांगितलेस, तरी मीही प्रयत्न करीन. पण याबाबतही तुझा काही दुराग्रह असेल तर तो सोडून दे.’
‘काका, मी दुराग्रही नाही. सुस्वभावी, माहितीतल्या पुरुषाशी विवाह होणे हे तुम्ही मान्य करता. संसार सुखाचा व्हायचा असेल तर मने जुळावी लागतात, हे तुम्हालाही पटते. पण जोडीदार हा लग्नाच्या वयाचा राहिला नसेल, तर त्याच्याशी विवाह करणे मान्य करण्यासारखे आहे, हे तुम्हाला मनापासून पटले, तर तुम्ही ते उघडपणे बोलून दाखविणार नाही. कारण तुम्ही पारंपरिकतेला जपू इच्छिता, लोकापवादाला तुम्ही घाबरता, असे मी म्हटले तर?’ अंजली म्हणाली.
योग्य जोडीदार म्हणजे कोण? त्याचा वयाशी संबंध असलाच पाहिजे का? काही दिवसांत झालेल्या ओळखीने लग्नासाठी दिलेला होकार वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी नेहमीच योग्य ठरतो का?
‘वादासाठी तुझा मुद्दा मी एक वेळ मान्य करतोही, पण तुझ्या मनात खरोखरच असा कोणी पुरुष भरला असेल, तर तो विचार सोडून दे. अगं, ज्या पुरुषाचे अर्धेअधिक आयुष्य संपले आहे अशा पुरुषाशी विवाह करण्याची इच्छा करण्यापेक्षा तू एखादा तरुण जोडीदार निवडणे अधिक श्रेयस्कर नाही का? जाणूनबुजून अध्र्या संसाराची अपेक्षा तू का करतेस?’ काका म्हणाले.
‘काका, एखाद्याचे योग्य वयात लग्न न होणे, हा त्या व्यक्तीचा दोष असू शकतो का? लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असतील. एखाद्याचा विवाह होणे-न होणे, तो कोणाशी व कधी होणे, संसारसुख मिळणे न मिळणे या गोष्टी जर नियती ठरवीत असेल व ते बहुतेक वेळा मान्यही करावे लागते, असे जर असेल तर वयाचा मुद्दाच केवळ का विचारात घ्यावा?’ अंजली म्हणाली.
‘तरीही तू असला विचार सोडावास असे मला वाटते.’ काका म्हणाले.
दोन-तीन मिनिटे स्तब्धतेत गेली.
अंजली पुढे म्हणाली-
‘काका, लहानपणापासून मी तुम्हाला पाहतेय. तुम्ही मला कळायला लागलेत त्यालाही आता आठ वर्षे झाली. सज्जनाचे सगळे गुण अंगी असूनही व निरोगी शरीराबरोबरच प्रसन्न चेहरा मिळूनही तुमचा विवाह अद्याप का झाला नाही?’
‘अगं, लग्नाचे एक वय असते, त्या वयात माझ्यावर काही जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे माझ्या लग्नाचा विचार मी केला नाही. नंतर मुली सांगून आल्या, पण नाही जमले. गेली ३५ वर्षे या चाळीतच मी पेइंग गेस्ट म्हणून राहतोय. लग्न करून संसार करायचा म्हणजे स्वत:ची जागा नको का? शिवाय, आमच्या ज्योतिषी काकांनीच सांगितले होते. लग्नयोग चाळिशीनंतर आहेत.’ काका सांगत होते.
अंजली म्हणाली, ‘ज्योतिषीकाकांनी ‘चाळिशीनंतर लग्न होईल’ इतकेच सांगितले होते? मला माहीत आहे सारी हकीगत. आमच्या घरीच ऐकली होती ती मी. ज्योतिषीकाकांनी असेही लिहून दिले आहे की, तुमचा विवाह एका सुंदर, सुस्वभावी मुलीशी होईल म्हणून.’
‘खरे आहे ते, पण नेहमीच ज्योतिष खरे होते काय?’ काका म्हणाले.
‘जर, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, लग्न ही योगायोगाची गोष्ट आहे, यावर तुमचा विश्वास आहे, तर ज्योतिषाने छातीठोकपणे लिहून दिलेल्या भविष्यावर तुमचा विश्वास असायला पाहिजे,’ अंजली बोलत होती.
काका स्तब्ध राहिले.
‘काका, आज तुम्ही माझी समजूत घालण्यासाठी, मी विवाह करावा, हे सांगण्यासाठी इथे मला आणले आहे, तर माझा निर्णय मी तुम्हाला सांगते. तुम्ही त्याच्यावर जरूर विचार करा,’ अंजली म्हणाली.
‘कोणता निर्णय?’ काकांनी विचारले.
‘काका, मला तुमच्याशी लग्न करायचेय..’ अंजली म्हणाली.
अंजलीचा निर्णय ऐकून काका तर सर्दच झाले. काय बोलावे हे सुचेनासे झाले. हिच्या वडिलांनी, ती लग्नाला तयार व्हावी म्हणून मला तिच्याशी बोलायला, समजूत काढायला सांगितले. ती लग्नाला तयार झाली आहे, पण तिचा निर्णय किती विचित्र आहे. हा निर्णय त्यांना मी कसा सांगू? त्यांचा माझ्याविषयी काय ग्रह होईल? चाळकरी काय म्हणतील? इतक्या वर्षांपासून सांभाळलेली इभ्रत एका क्षणात धुळीला नाही का मिळणार? अनेक प्रश्नांचे काहूर काकांच्या मनात दाटून आले.
‘काका बोलत का नाही?’ अंजली म्हणाली.
‘काय बोलू? अगं, धर्मसंकटात टाकलेयस तू मला. तुझ्या आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे तू लग्न करायला तयार झाली आहेस, ही आनंदाची बातमी त्यांच्या कानावर मला घालायची होती, पण झाले भलतेच. कोणत्या तोंडाने तुझा निर्णय मी त्यांच्या कानावर घालू?’ काका म्हणाले.
‘काका, निर्णय तुम्ही नाही, मीच त्यांच्या कानावर घालीन.’ अंजली.
‘अगं, असा वेडेपणा करू नकोस, माझ्याविषयी गैरसमज होईल, असे काही करू नकोस.’ काका.
‘काका, मी तुम्हाला पसंत नसेन, तुमचा संसार मी करू शकणार नाही, असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर काही हरकत नाही. मी तसे वागणार नाही. पण मी पक्के ठरवलेय की, लग्न तुमच्याशीच करायचे, नाही तर आजन्म मी कुमारी राहीन. अर्थात माझ्या घरी हा निर्णय पटणार नाही. त्यामुळे वेळच आली तर मी घर सोडेन. लीव्ह लायसन्सवर जागा शोधीन व तेथे राहीन, पण माझ्या निर्णयात मी बदल करणार नाही.’ अंजली म्हणाली.
काका निरुत्तर झाले. काय बोलावे त्यांना कळत नव्हते. जन्मभर अविवाहित राहण्याचा त्यांचा ‘पण’ नव्हता. जमले तर त्यांनाही संसार थाटायचा होता, पण ही जर-तरची भाषा होती. आज एक तरुण, सुस्वरूप, सुस्वभावी मुलगी आपणहून त्यांच्याशी विवाह करू इच्छित होती. अंजली असा काही निर्णय घेईल हे स्वप्नातही त्यांच्या कधी आले नव्हते. अंजली त्यांना प्रिय होती, पण ती आपली पत्नी व्हावी, असा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावला नाही. नाही म्हटले तरी, लोकापवादाचीही भीती होतीच. त्याहीपेक्षा एका तरुणीने एका प्रौढाशी लग्न करणे त्यांना मान्य नव्हते. पण याच वेळी ज्योतिषीकाकांचे भविष्यही त्यांना खुणावत होते. ते जर खरे होणार असेल तर? तर आपल्याला लग्न करावेच लागेल. काय करावे? अंजलीचा निर्णय मी काही तिच्या आई-वडिलांच्या कानावर घालू शकणार नाही, असे काकांना वाटत होते.
‘काका इतके गोंधळून जाऊ नका. माझा निर्णय मी स्वत:च आई-वडिलांच्या कानावर घालते. तुम्ही टेन्शन घेऊ नका.’
अंजलीचे मन वळविण्यात काका अयशस्वी ठरले होते. एका अपराधीपणाच्या भावनेने ते चालू लागले. अंजलीही पाठोपाठ चालत होती. काका चालत होते. घरी पोहोचल्यावर काय उत्तर द्यायचे, याचा विचार करीत. तर अंजली चालत होती आपला निर्णय कळविण्याच्या विचाराने. अंजली परिणामांची काळजी करीत नव्हती; काका परिणामांचा विचार करीत चालले होते.
दोघेही चाळीपर्यंत पोहोचल्यावर काका न बोलता आपल्या रूमवर गेले. अंजली आपल्या घरात गेली. ‘अंजली काय झाले?’ आई-वडिलांनी अधीरतेने विचारले. ‘सांगेन उद्या सकाळी.’ तोपर्यंत वाट पाहण्याचा आई-वडिलांना धीर नव्हता. ते काकांच्या खोलीवर आले. काकांचा काळजीयुक्त चेहरा पाहून काही फलित निघाल्याचे दिसत नाही, असे त्यांना वाटले.
‘काका गप्प का? काय बोलणे झाले?’
आई-वडिलांनी विचारले.
‘बोलणे झाले, पण अंजलीचा निर्णय माझ्या तोंडून सांगणे मला जमणार नाही. माझी अपराध्यासारखी भावना झाली आहे. मी तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. अंजलीच्याच तोंडून ऐका’ काका म्हणाले.
आता दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. दिवस उजाडला. सकाळची लगबग संपली. बँकेत जाण्यासाठी अंजली तयार झाली. टिफिन बॉक्स हातात देता देता आईने तिला विचारले, ‘तू निर्णय घेतला आहेस म्हणे. काय निर्णय घेतलायस?’
‘मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय’ अंजली.
‘व्वा, देव पावला म्हणायचा’ आई.
‘मी काकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय’ अंजली.
इतके बोलून अंजली घराबाहेर पडली. तिच्या आईचा तिच्या कानांवर विश्वास बसेना. काय जगावेगळा निर्णय केलाय पोरीने!! आईची अशी अवस्था झाली. वडिलांना ते कळले. आता पुढे काय? अनुत्तरित प्रश्नाचा विचार करण्यातच दिवस निघून गेला.
संध्याकाळी अंजली घरी आली. कोणीच काही बोलले नाही. रात्री आई-बाबांनी अंजलीला सांगितले, ‘किती विचित्र निर्णय घेतलायस तू. काकांनाही धर्मसंकटात टाकलेयस. फेरविचार कर.’
‘आई, बाबा, पूर्ण विचार करूनच मी निर्णय घेतलाय. मी काकांशीच लग्न करीन, नाही तर मी आजन्म कुमारिका राहीन. माझा निर्णय तुम्हाला मान्य होणार नाही. माझा आग्रह नाही तुम्ही तो मान्य करावा. तुम्हाला दुखवावे म्हणून मी निर्णय घेतलेला नाही. जगावेगळे काही करून दाखवायचे म्हणूनही हा निर्णय नाही. वाढलेले वय हा मुद्दा सोडला तर काकांच्यात काय वैगुण्य आहे. सगळ्यांसाठी झटणाऱ्या काकांचे एकाकी जीवन मला बदलायचेय. मला काकांचा संसार करायचाय म्हणून हा निर्णय आहे. माझ्या या निर्णयामुळे तुम्ही व्यथित व्हाल, याची मला कल्पना आहे, तरीही या निर्णयापासून परावृत्त व्हावे, असे मला वाटत नाही. मी माझा निर्णय तुम्हावर व काकांवर लादू इच्छित नाही, पण एक नक्की, मीसुद्धा काकांसारखेच एकाकी आयुष्य जगेन. माझी मी स्वतंत्रही राहीन.’ अंजली निश्चयपूर्वक बोलत होती.
अंजलीच्या या विचित्र निर्णयाने काकाही बेचैन झाले होते. अंजली त्यांना आवडत होती, पण ती एक सद्गुणी मुलगी म्हणून. तिचा पत्नी या नात्याने ते कधी विचारच करू शकत नव्हते. तसे त्यांच्या मनातही नव्हते, पण अगदी अनपेक्षितपणे अंजलीने प्रश्नचिन्ह उभे केले होते. उपाय एकच होता, महिन्याभराची रजा घेऊन कोकणात गावी जाऊन राहायचे व तेथून आल्यावर लीव्ह लायसन्सची जागा पाहून या चाळीपासून दूर जायचे. या उपायामुळे तरी अंजलीचा विचार बदलणार होता का? सुतराम शक्यता नव्हती.
काका एक-दोन दिवसांतच गावी निघून गेले, तरी चाळीत चर्चा सुरू झाली. अंजलीला व काकांना चाळीतील सर्व ओळखून होते. या विचित्र परिस्थितीत आक्रस्ताळेपणा करून चालणार नव्हता. संयमाने मार्ग काढायला हवा होता.
एक महिनाभर चाळीतले वातावरण उदासीनतेचेच होते. त्या चाळीतील सर्व चाळकरी एकमेकांना विचारणारे होते. अंजलीचा निर्णय तिचा व्यक्तिगत खरा, पण यामुळे दोन कुटुंबांत जे वातावरण तयार झाले, ते कोणाला रुचण्यासारखे नव्हते. यातून काही तरी मार्ग काढायलाच पाहिजे. अंजली काय किंवा काका काय, दोघांविषयी चाळकऱ्यांच्या मनात आपुलकीचीच भावना होती. रोज रात्री चाळकरी एकत्र जमून याच विषयावर चर्चा करीत. सर्वानुमते अंजलीच्या घरच्यांची समजूत काढायचे ठरले. ‘वय’ हा मुद्दा सोडल्यास काकांबद्दल त्यांचा कोणताही आक्षेप नव्हता. सरतेशेवटी अंजलीचे आई-वडील लग्न लावून द्यायला नाखुशीने का होईना, पण तयार झाले. आता काकांचे मन वळवून त्याचा होकार घेणे आवश्यक होते.
महिन्याची रजा संपल्यावर काका गावाहून परतले. चाळीतले वातावरण काय असेल, याचे दडपण होते. इतकी वर्षे ज्या आजींकडे ते पेइंग गेस्ट म्हणून राहत होते, त्या आजींना त्यांनी सांगितले, ‘आजी, आजपर्यंत घरच्यासारखा मी येथे राहिलो, पण अंजलीच्या विचित्र निर्णयामुळे मी आता येथे राहणे बरे होणार नाही. सांगायला मला अतिशय दु:ख होतेय, पण अशा परिस्थितीत मी चाळच नव्हे, तर मुंबईतला मुक्कामही हलवायचे ठरवलेय. मी कल्याणच्या बाजूला लीव्ह लायसन्सची जागा बघितली आहे. ती लवकरच ताब्यात येईल. मी लवकरच तिथे जाईन.’
‘काका, जागा शोधलीस, तर घाई नको. या चाळीतच तुला जागा मिळेल’ आजी म्हणाल्या.
‘पण आजी, मी कोणत्या कारणासाठी या निर्णयाप्रत आलो, हे तर लक्षात घ्या’ काका म्हणाले.
आजी म्हणाल्या, ‘काका, मी काय म्हणते याचा जरा शांतपणे विचार कर. लग्न करायचेच नाही असा तुझा ‘पण’ नाही. वाढत्या वयाचा विचार करून केवळ मन मारून तू असा विचार करतोयस. नियतीच्याच मनात तुझे लग्न अंजलीशीच होणार असेल, तर तू काय करणार? जरा तुझे ज्योतिष उघडून बघ. हे लग्न लावून द्यायला चाळकऱ्यांनी अंजलीच्या आई-वडिलांना राजी केलेय. तूही आता जरा व्यावहारिक निर्णय घे. स्वत:ला घोडनवरा समजू नकोस. अशा प्रकारची लग्ने पूर्वी सर्रास व्हायची. अंजलीकडे पत्नी या नजरेने तू कधी पाहिलेले नसल्याने तुला अपराधी वाटत असेल, पण जे घडणार आहे ते भल्यासाठीच असेल. हा विचार करून होकार दे. आढेवेढे घेऊ नकोस. तुझ्या नातेवाईकांना सर्व सांगून त्यांना राजी करायची जबाबदारी आमची चाळकऱ्यांची.’
हो-ना करता अखेर काकाही लग्नाला तयार झाले. गिरगावातल्या एका छोटय़ा हॉलमध्ये काकांचा व अंजलीचा विवाह संपन्न झाला. चाळीच्याच बाजूला त्यांनी लीव्ह लायसन्सने जागा घेतली. काकांचा-अंजलीचा संसार सुरू झाला. दोघांच्याही नोकऱ्या सुरळीत सुरू होत्या. काकांनी बँकेकडून लोन घेऊन दोन-तीन वर्षांनी एक मोठा फ्लॅट घेतला. काकांचे बिऱ्हाड नव्याने थाटले गेले.
अशीच काही वर्षे निघून गेली. काकांना मुलगाही झाला. सर्वसाधारणत: संसारात ज्या काही कडू-गोड घटना घडतात त्या त्यांच्याही संसारात घडल्या.
बोलता बोलता दहा वर्षे निघून गेली. काकांनी अठ्ठावन्न वर्षे पूर्ण केली. नियत वयोमानानुसार ते निवृत्त झाले. एक दिवस शांतपणे बसले असताना गेल्या बारा-तेरा वर्षांतील घटना त्यांच्या डोळ्यांपुढे तरळू लागल्या. अंजलीच्या निर्णयामुळे व चाळकरी, अंजलीचे आई-वडील यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे आपण संसारात पडलो. मी बरोबर वागलो की चुकीचे? मी वागलो ते बरोबरही नव्हते वा चुकीचेही नव्हते. जे काय घडले, ते नियतीने घडविले. आणि जे घडले ते चांगलेच घडले. आपल्या लग्नाची ही एक वेगळीच गोष्ट आहे. पण या वेगळ्या गोष्टीनेच आपले आयुष्य पार बदलून टाकले.
काकांना रिटायर्ड होऊनही आता बारा वर्षे झाली. वयाची सत्तरी उलटल्यावर काका एके दिवशी आजारी पडले. अंजलीने उत्तम प्रकारे त्यांची सेवा केली. एके दिवशी काकांनी सर्वाचा निरोप घेतला. अंजली डगमगली नाही. आपल्या मुलाला तिने उत्तम शिक्षण दिले. कालांतराने मुलाचे लग्न झाले. सून घरात आली.
एका वेगळ्या लग्नाची ही वेगळी गोष्ट.

No comments:

Post a Comment