Lagnasi Jata.. Vighne Yeti Nana - Marathi Vivah Goshta

लग्नासी जाता.. विघ्ने येती नाना..

मी पदवीधर केव्हा होतोय याची वाट माझे वडील पाहतच होते. भायखळ्याच्या भाजीबाजारातल्या गाळ्यावर बसून मी शक्य तितक्या लवकर चरितार्थाला लागावं, म्हणजे लगेचच माझे दोनाचे चार हात करता येतील, असा वडिलांचा बेत होता. गाळ्यावर बसण्यासाठी पदवीपर्यंतच्या शिक्षणाची खरं तर गरज नव्हती. म्हणून वडील मी मॅट्रिक झाल्यापासून माझ्या मागे लागले होते. पन्नास-साठ वर्षांपूर्वी बहुजन समाजातील मुले फारशी शिकत नसत. तेव्हा वडिलांचंही बरोबरच होतं. पदवीचं सर्टििफकेट हातात पडायच्या आधीच त्यांनी जातीतल्या चार मुलींची स्थळं सुचवली आणि त्यांच्यापकी कुणा तरी एकीची ताबडतोब निवड कर, असे फर्मान सोडलं. त्या मुली मला ज्ञात होत्या. शिक्षण जेमतेम होतं. दिसणं असायलाच पाहिजे असा त्यांचा ग्रह असावा असे काही त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसत नव्हतं. थोडक्यात रूपाच्या बाबतीत आनंदी- आनंदच होता. त्यांच्याशी लग्न लावण्यापेक्षा वानप्रस्थाला जाणं अधिक आनंददायी ठरलं असतं. पण हे सगळे वडिलांना सांगायचं कसं? त्या वेळचे वडील! खरं तर त्यांना बाप हाच शब्द योग्य होता. बला टळावी म्हणून मी वडिलांना म्हटलं, ‘‘मला पोस्ट ग्रॅज्युएट होऊ द्या, मग मी लग्नाला उभा राहीन’’. मला चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या गोष्टीतल्या म्हातारी वाघाला ‘‘लेकीकडे तूप-रोटी खाऊन जाडजूड होऊन परत येईन तेव्हा तू मला खा’’ म्हणाली होती त्याची आठवण झाली. वडील कबूल झाले. माझे आजचे मरण उद्यावर, खरं तर दोन वर्षांवर ढकललं गेलं होतं.
दोन वर्षांनी मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो. ते समजताच वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता दुसऱ्या चार मुलींची स्थळं सुचवली. या आधीच्या चार मुलींच्या रूपांच्या संदर्भात या मुलींच्या रूपाची उतरती भाजणी होती. नाकीडोळी, सगळं बेतास बेत होतं. वडिलांचा हाही बेत उधळून लावला नाही तर यातल्या एखाद्या कुस्वरूप रूपवतीला आपली सौभाग्यवती करून घ्यायला लागेल या कल्पनेने पोटात गोळा आला. आपण जर त्वरित आपलं सौभाग्य शोधलं नाही तर आपल्या दुर्भाग्याला सीमा राहणार नाही याची जाणीव मला झाली. दुसऱ्या दिवसापासून मी शोध सुरू केला. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे पाहू लागलो, पण एक पंचाईत झाली. कारण मी जरी मुलींकडे आशेने पाहात होतो तरी एकही मुलगी माझ्याकडे पाहात नव्हती. इथे पदार्थ विज्ञानातील नियम आड येत होता. त्या नियमाप्रमाणे काळ्या वस्तूवर प्रकाश पडला तर तो परावर्तित होत नाही. त्यामुळे ती वस्तू दिसत नाही. (हा नियम शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पुढच्या बेचाळीस पिढय़ा ब्रह्मचारी राहतील, अशी ‘संताप-वाणी’ मी त्या वेळी काढल्याचं मला चांगलं आठवतंय.)
आम्ही आपापल्या जन्मदात्यांना निक्षून सांगितलं ‘‘बऱ्या बोलानं आमचं लग्न लावून द्या- नाही तर आम्ही पळून जाऊन लग्न करू.’’ दोन्हीकडची माणसं अब्रूला घाबरली.
वधू शोधणं थोडं कठीणच होऊन बसलं होतं. आजच्याप्रमाणे त्याकाळी कॉलेजातली मुलं-मुली खांद्याला खांदा लावून आणि गळ्यात गळा घालून शिकत नव्हती. त्यामुळे कॉलेजात माझ्या ‘गळाला’ कुणी लागलं नव्हतं. बरं, आजच्या प्रमाणात गल्लोगल्ली ‘नवसाला पावणारे’ गणपतीही नव्हते. त्यामुळे नवस तरी कोणाला बोलावा आणि आपल्या लग्नातील हे ‘विघ्न’ कुठल्या विघ्नहर्त्यांला सांगावं याचा प्रश्न पडला. पण ज्याचा कोणी वाली नसतो, त्याचा वाली देव असतो असं म्हणतात, त्याप्रमाणे माझ्या मदतीला देव नाही तर, ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ अशी ‘वाणी’ उच्चारणारी आकाशवाणी आली (देवाच्या या नाकर्तेपणामुळेच मी तेव्हापासून नास्तिक झालो) मी तेव्हा युवा-वाणीमध्ये कथा-कविता सादर करायचो. तिथे तेव्हा प्रसिद्ध लेखक रवींद्र पिंगे होते. नेमकी त्याच वेळेला एक निमकाळी मुलगी आपल्या कविता सादर करायला यायची. ती अर्धी काळी अन् अर्धी गोरी असल्यामुळे पदार्थ विज्ञान शास्त्राचा नियम झुगारून दिसायची. मी ‘गळ’ टाकायचं ठरवलं. रेकॉर्डिग संपल्यावर मुद्दाम भेटायचो. तिच्या कविताचं ‘उदे गं अंबाबाई’ म्हणून भरपूर उदोउदो करायचो. पुरुषांच्या खोटय़ा स्तुतीला न भुलणारी एक तरी स्त्री जगात आहे काय? माझी भूलथाप फळाला आली. मासा गळाला लागला.
मी वडिलांसमोर मोठय़ा ऐटीत जाऊन उभा राहिलो आणि म्हणालो,
‘‘तुम्ही माझ्यासाठी मुलगी पाहू नका. मी मुलगी पसंत केलीय’’.
‘‘अरे वा उत्तम - शेवटी गंगेत घोडं न्हालं म्हणायचं.’’ वडिलांच्या चेहऱ्यावर ‘गंगास्नान’ केल्याचा आनंद दिसत होता.
‘‘काय - नाव मुलींच्याकडचं - म्हणजे आडनाव?’’
‘‘खांबेकर’’.
‘‘खांबेकर? पण हे असलं नाव आपल्या जातीत नसतं’’
’‘कसं असेल? ती आपल्या जातीची नाहीए’’
‘‘मग कोणत्या जातीची?’’
‘‘शिंपी’’
‘‘शिंपीऽ?’’ वडील अंगावर विंचू पडल्यासारखे ओरडले.
‘शिंपी’ जातीच्या नावाला जरा भारदस्तपणा यावा म्हणून मी म्हणालो,
‘‘म्हणजे कोकणस्थ नामदेव शिंपी’’
कोकणस्थ ब्राह्मण स्वत:ची जात सांगताना ज्या फुशारकीनं सांगतात, काहीशी तीच फुशारकी माझ्या स्वरात होती, पण माझी ही फुशारकी कुचकामी ठरली.
वडील दात-ओठ खात म्हणाले,
‘‘एवढा शिकलास - पण तुला काही अक्कल? आपण ‘माळी’ ते ‘शिंपी’. आपण कुठं? ते कुठं??’’
‘माळी’ नेमके कुठे आणि ‘शिंपी’ कुठे हे काही मला केल्या कळेना. मी वडिलांकडे अडाण्यासारखं पाहात राहिलो. पण वडिलांनी माझा ‘अडाणीपणा’ तात्काळ दूर केला, म्हणाले -
‘‘अरे, आपण माळी म्हणजे श्रेष्ठ - ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ’’
‘माळी’ जात ही सर्व जातींत श्रेष्ठ हे ज्ञान मला नव्यानंच प्राप्त झालं होतं. नक्की श्रेष्ठ कशी हे समजावं म्हणून मी तीर्थरूपांना विचारलं,
‘‘आपली जात श्रेष्ठ कशी?’’ एवढं बोलून मी तोंडावर बोट ठेवलं.
‘‘अरे बावळटा, आपण माळी फुलं पिकवतो - तेव्हा ना ते ब्राह्मण देवाची पूजा करतात? आपण फुलंच पिकवली नाही तर कसली पूजा - अन् कसले ब्राह्मण?’’
मला त्या वेळच्या माझ्या ज्ञानाच्या पातळीप्रमाणे वडिलांचं म्हणणं तंतोतंत पटलं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावी पत्नीला म्हणालो,
‘‘आपलं लग्न जमणं शक्य नाही’’
‘‘का?’’
‘‘वडील म्हणतात, माळी शिंप्यापेक्षाच काय पण ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ आहे.’’ मी वडिलांचं संशोधन तिच्या कानावर घातलं ते फूलं-पूजा, वगैरे वगैरे.
या भेटीनंतर दोन दिवसांनी वाग्दत्त वधूचा ऑफिसात फोन आला,
‘‘संध्याकाळी ‘दादर’ला भेटा. महत्त्वाचा निरोप सांगायचाय.’’ संध्याकाळी आम्ही दोघं एका निवांत हॉटेलात भेटलो.
‘‘तुझ्या वडिलांचं म्हणणं मी माझ्या वडिलांना सांगितलं.’’
‘‘मग? पटलं असेल त्यांना?’’
‘‘नाही, अजिबात नाही. मला ते म्हणाले, त्याच्या वडिलांना जाऊन सांग, आम्ही शिंपी- आम्ही जर कपडेच शिवले नाही तर-तुम्ही माळी आणि ब्राह्मणच काय तुमचे देवही दिगंबर अवस्थेत तोंड लपवून बसाल. मग कसली फुलं, कसली पूजा, कसले माळी आणि कसले ब्राह्मण?’’
आमची दोघांचीही अवस्था द. मा. मिरासदारांच्या कथेतल्या त्या दोन्ही बाजूंकडून थपडा खाणाऱ्या शाळकरी पोरासारखी झाली. त्याच्या बापाचं मत होतं की, शिवाजी महाराज निरक्षर होते, तर त्याच्या इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकाचं मत होतं की, महाराज साक्षर होते. त्या दोघांच्या परस्परविरोधी मतांच्या निरोपाची देवाणघेवाण करताना त्या पोराला दोन्हीकडून थपडा खाव्या लागतात. आम्हाला थपडा खायच्या नव्हत्या. आम्ही आपापल्या जन्मदात्यांना निक्षून सांगितलं, ‘‘बऱ्या बोलानं आमचं लग्न लावून द्या- नाही तर आम्ही पळून जाऊन लग्न करू.’’ दोन्हीकडची माणसं अब्रूला घाबरली. लग्नाला तयार झाली, पण भावी सासऱ्यानं अट घातली की, पत्रिका जुळल्या पाहिजेत. वडिलांनी पत्रिका पाठवली. उलट पावली निरोप आला, पत्रिकेत मुलाला मंगळ आहे. हे लग्न झाल्यास मुलीला वैधव्य योग संभवतो. तो भोग आम्हाला नको. सहा महिन्यांच्या आत मुलाला देवाज्ञा होईल या लग्नामुळे.’’
माझ्या भावी पत्नीचं तोंड चिमणीएवढं झालं. मी गमतीने तिला म्हणालो, चांगलं आहे की सहा महिन्यांत तुला दुसरा चान्स. मग मी तिची समजूत काढली. म्हटलं, त्या मंगळाला काही उद्योग नाही का, त्या नवग्रहात फिरायचं सोडून तो कशाला माझ्या पत्रिकेत येऊन बसेल. कुठल्याही ग्रहाचा मानवी आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही. आधुनिक विज्ञानाने ते सिद्ध केले आहे. भृगू ऋषी पावले. तिची समजूत पटली. मग पुन्हा एकदा आम्ही आपापल्या पिताश्रींना तोंडीच फायनल नोटीस दिली. जर दोन महिन्यांच्या आत तुम्ही आम्हाला बोहल्यावर उभं केलं नाही, तर मॅरेज रजिस्ट्रारच्या दारात उभं राहण्यात येईल. नोटीस लागू पडली. दोन्हीकडच्या लोकांना मिरवण्याची संधी घालवायची नव्हती. लग्न थाटामाटात झाले. चाळीस वर्षे सुखाचा संसार झाला. लग्नानंतर सहा महिन्यांत येणारी देवाची आज्ञा आली नाही. उजाडल्यापासून घरच्या देवीच्या आज्ञा मात्र पाळत बसावं लागतं. सूर्यास्तानंतर मात्र माझीच आज्ञा चालते.

No comments:

Post a Comment