सर्वश्रेष्ठ मॅचविनर
द्वारकानाथ संझगिरी
परवा खूप दिवसांनी भागवत चंद्रशेखरशी बोलणं झालं. त्याचा वाढदिवस होता. त्यानं ७७ व्या वर्षात पदार्पण केलं. अधूनमधून मी त्याच्याशी गप्पा मारत असतो आणि बोलण्याचे विषय ठरलेले असतात. क्रिकेट, सैगल, मुकेश वगैरे.
गेल्या वर्षी त्याच्यासाठी मी मुंबईत मुकेशच्या गाण्यांचा कार्यक्रम ठरवला होता. दिवस ठरला. हॉल बुक झाला. मुख्तार हा भारतातला मुकेशचा आवाज आज मानला जातो, तो येऊन गाणार होता. चंद्रशेखर येणार म्हणून तोही सुखावला होता; पण कोरोना आला आणि आमचे सगळे मनोरे वाळूचे ठरले; पण ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ असं ज्या दिवशी वाटेल, त्या दिवशी कार्यक्रम करायचा असं आम्ही ठरवूनच टाकलं. त्याची संपूर्ण कारकीर्द तशी मी लांबूनच पाहिलीय. तो मित्र झाला, अलीकडे दहा-पंधरा वर्षं झाली. चंद्रानं गोलंदाजी टाकायला सुरवात केली की भरगच्च स्टेडियम ‘बोsssल्ड’ असं त्याच्या स्टार्ट बरोबर ओरडायचं. त्यात माझाही आवाज असायचा.
‘त्याचा फास्टरवन थॉम्सनपेक्षा जास्त वेगात येतो,’ असं व्हिव्हियन रिचर्डस् चंद्राबद्दल जेव्हा वदला ना (मोठी माणसं नेहमी वदतात, आपण बोलतो.) तेव्हा अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यात मीही होतो.
सन १९७१ मध्ये ओव्हलची टेस्ट जिंकल्यानंतर शिवाजी पार्कला सर्व नाचले. त्यात मीही होतो. आणि माझ्या हातात वाडेकरबरोबर चंद्राचासुद्धा फोटो होता. त्यानं पेटवलेल्या थेम्स नदीचा थरार मी आदल्याच दिवशी त्याच शिवाजी पार्कच्या गवतात मित्राच्या ट्रान्झिस्टरवर अनुभवला होता. परवा मी त्याला सहज विचारलं : ‘‘त्या ओव्हल कसोटीत इंग्लडच्या दुसऱ्या डावात फील्डिंगला जाताना तुला, तुझ्या हातून पुढचा वणवा पेटणार आहे, याची जाणीव होती का रे?’
तो म्हणाला : ‘छे रे. अजिबातच नव्हती; पण मी विश्वनाथला सहजच म्हटलं होतं की, मला काहीतरी करून दाखवायचं आहे.’’ नियतीनं बहुतेक ते ऐकलं आणि ती ‘तथास्तु’ म्हणाली.
चंद्रशेखरनं काही ठरवून कधी केलंच नाही. नियती त्याचा दिवस ठरवायची आणि त्याच्या मनगटातून भारतीय क्रिकेटचं एखादं देदीप्यमान पान लिहून घ्यायची. आमचा राजू भारतन तर नेहमी म्हणायचा, Bedi thinks before he spins while Chandra spins before he thinks.
‘चंद्रशेखर हा मी पाहिलेला भारताचा सर्वश्रेष्ठ मॅचविनर,’ हे विधान मला अजूनतरी बदलावं लागलेलं नाही. त्यानंतर अनेक मॅचविनिंग गोलंदाज भारतासाठी खेळले. प्रसन्ना, कपिलदेव, कुंबळे आता अश्विन, बुमराह...पण चंद्रा आहे तिथंच आहे. कुठल्याही खेळपट्टीवर विकेट मिळवण्याची ताकद त्याच्या मनगटात होती. बघता बघता तो डाव उलटवायचा.
बाकीच्या मॅचविनर्सपेक्षा त्याला जर काही थोडंसं जास्त मिळालं असेल, तर करिअरच्या टॉपवर असताना त्याला अत्यंत उत्कृष्ट क्लोज इन क्षेत्ररक्षक मिळाले. त्यात वाडेकर होता, व्यंकट होता, आबिद अली होता आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला सोलकर तर होताच होता. मला आजही आठवतंय की, माधव आपटेंच्या घरी पार्टी होती आणि वेस्टइंडियन प्लेअर्स आले होते त्या वेळेला वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी सांगितलं होतं की, ‘आम्हाला चंद्राची भीती वाटतेच; पण चंद्रापेक्षा जास्त भीती आम्हाला एकनाथ सोलकरची वाटते. कारण, त्याचा हात फक्त येताना दिसतो, तो दिसत नाही.’
पण इतर बाबतीत चंद्रा आजच्या पिढीपेक्षा दुर्दैवी होता. एकंदरीत त्या काळामध्ये जागतिक दर्जाचे फलंदाज अनेक होते आणि खूपच मोठे होते. बॅरिंग्टन होता, ग्रेव्हिनी होता, सोबर्स होता, कनाय होता, लॉईड होता, रिचर्डसं होता, ग्रिनीच होता, सिम्सन होता, लॉरी होता, पीटर बर्ज होता...अनेकांना त्यानं गोलंदाजी केली. आणि नुसती गोलंदाजीच नाही केली, तर त्यानं दादागिरीसुद्धा केली. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट चंद्राला मिळाली नाही ना त्या काळात, ती होती न्यूट्रल पंच आणि DRS. परवा, दिलीप वेंगसरकरनं कुठं तरी म्हटलंय की, ‘न्यूट्रल पंच आणि DRS जर चंद्राला मिळाले असते ना, तर त्यानं ८०० विकेट्स घेतल्या असता.’ ही अतिशयोक्ती आहे असं समजू नका. न्यूट्रल पंच आणि DRS नसल्यामुळे अनेक निर्णय चंद्राच्या विरोधात गेले. न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी तर चंद्राला कितीतरी भयानक पंच भेटले. चंद्रा हा तसा अत्यंत शांत माणूस. न चिडणारा. तांडव वगैरे मैदानावर न करणारा. एकदा न्यूझीलंडमध्ये त्यानं एका फलंदाजाला बोल्ड केलं. तरीही त्यानं अपील केलं. तेव्हा पंच त्याला म्हणाले : ‘अरे, अपील काय करतोयस? तो तर बोल्ड झालाय.’ तो म्हणाला : ‘हो. बोल्ड झालाय; पण तो बाद आहे का?’ इतका तिथल्या पंचगिरीवर तो वैतागलेला होता.
सन १९७८ मध्ये त्यानं मेलबर्नवर १२ विकेट्स घेऊन कसोटी सामना जिंकून दिला. खरं तर तो ब्रिस्बेन, पर्थलासुद्धा जिंकून देऊ शकला असता; पण पंचांनी त्याच्या काढलेल्या विकेट्स काढून घेतल्या; किंबहुना ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बॉबी सिम्सन तर एका डावात तीन तीन डाव खेळायचा.त्याला पहिल्या फटक्यात बाद द्यायचं नाही हा गुप्त वटहुकूम असावा. महत्त्वाची गोष्ट अशी होती की, मध्यंतरी इम्रान खाननं लेग स्पिनर अब्दुल कादिर याच्याबद्दल बोलताना असं म्हटलं होतं की, ‘अब्दुल कादिर हा शेन वॉर्न पेक्षा जास्त मोठा लेन स्पिनर आहे.’
इंग्लडच्या ग्रॅहाम गूचचंसुद्धा हेच मत आहे आणि त्यानं ते मत मांडताना असं म्हटलं होतं की, ‘त्या काळात फलंदाज जर फ्रंट फूटवर असेल तर पायचीत सहसा दिलं जात नसे.’ चंद्राच्या बाबतीतसुद्धा हा प्रश्न उद्भवला होता.
चंद्राची जी ताकद होती, ती कशात होती? ती त्याच्या चेंडूच्या वेगात होती. तो वेगात चेंडू टाकायचा. तो वेगात चेंडू वळवायचा. त्याचा चेंडू उसळी घ्यायचा. म्हणजे एका अर्थी त्याच्या हातात त्रिशूलच होतं. ते त्रिशूल झेलणं हे खूप मोठ्या फलंदाजांनाही जमलेलं नाही. मला त्याच्या काही विकेट्स तर फार आठवतात.
म्हणजे ब्रेबॉनला १९६४ मध्ये त्याचा चेंडू पीटर बर्गची ऑफ बेल घेऊन गेला होता. काय सुंदर चेंडू होता! ऑस्ट्रेलियाला ग्रेग सार्जंट त्रिफळाचित झाला, तेव्हा त्याला कळलंच नाही की नेमकं काय झालं. त्याला वाटलं की भुताटकीच झाली. त्याची सर्वोत्कृष्ट विकेट म्हणजे इंग्लंडमधली बॅरिंग्टनची. बॅरिंग्टन हा एक महान फलंदाज होता. त्याचा बचाव भेदून जाणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती. तो ९७ वर बॅटिंग करत होता. चंद्रशेखरनं त्याचा बोल्ड काढला. त्या वेळी इंग्लंडचा गाजलेला लेखक अॅलेक्स बॅनिस्टर आश्चर्यचकित झाला आणि त्यानं असं लिहलं की, ‘बॅरिंग्टन इतका सेट झालेला होता की त्याला फक्त भूकंपच हलवू शकेल असं वाटत होतं.’ चंद्रा असेच भूकंप घडवून आणायचा.
त्याच्या कारकीर्दीत आपण १४ कसोटी जिंकल्या. त्यात चंद्रानं १९ च्या सरासरीनं ९८ बळी घेतले. ज्या वेळी यश हे ‘कपिलाषष्टीचा योग’ मानलं जायचा तेव्हा हे यश त्यानं मिळवलं. अगदी भारतीय खेळपट्टीवरसुद्धा त्या वेळी त्याला धावांचं पाठबळ मिळालं नाही. ३०० धावा म्हणजे डोक्यावरून पाणी. कितीतरी वेळा धावा पाठीशी नाहीत म्हणून त्याचा पराक्रम मातीमोल ठरला. महत्त्वाची गोष्ट अशी की, चंद्राचा उजवा हात पोलिओमुळे बारीक झालेला असला, कमकुवत असला तरीसुद्धा त्यानं क्षेत्ररक्षण कधी टाळलं नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. आणि डाव्या हातानं तो थेट चांगला थ्रो करायचा. फक्त त्याच्या हातामुळे त्याला फलंदाजी जमली नाही आणि त्यानं काढलेल्या विकेट्सपेक्षा त्याच्या धावा कसोटी क्रिकेटमधल्या कमी आहेत. तो किती साधा आणि मुकेशप्रेमी! एकदा सुनीलला त्यानं बीट केलं. सुनील त्या चेंडूचा विचार करत असताना चंद्रा त्याला म्हणाला : ‘‘सुना क्या?’’
सुनील म्हणाला : ‘क्या?’
चंद्रा म्हणाला : ‘मुकेश का गाना...’
प्रेक्षकांतून कुणाच्या तरी रेडिओवर मुकेशच गाणं ऐकू येत होतं.
सन १९७१ मध्ये इंग्लंडहून जिंकून आल्यावर विमानतळ चंद्राला पाहायला माणसांनी तुडुंब भरला होता आणि चंद्रा काय करत होता? तो राजू भारतनला शोधत होता. राजू त्याला सैगलची दुर्मिळ रेकॉर्ड देणार होता. क्रिकेटप्रेमींच्या देव्हाऱ्यातले देव नेहमी वाढत राहतात. मग मागचे विसरले जातात. मी नशीबवान, माझ्या देव्हाऱ्यातले बरेच देव मित्र झाले.
चंद्रा त्यातला एक.
(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)
No comments:
Post a Comment