Gentleman, Well Mannered Ken Williamson
सज्जन, सुसंस्कृत केन विलियम्सन
द्वारकानाथ संझगिरी
भारतीय संघानं कसोटी क्रिकेटची चॅम्पियनशिप न जिंकल्याबद्दल एक भारतीय म्हणून मला दुःख जरूर झालं; पण राष्ट्रप्रेमाचा भाग सोडला तर, क्रिकेटप्रेमी म्हणून एका सज्जन, सुसंस्कृत क्रिकेटपटूच्या संघाला यशानं ‘वरलं’ हे पाहून आनंदही झाला. ती चॅम्पियनशिप ‘सुस्थळी’ पडली. भारताबाहेरचे दोन क्रिकेटपटू मला प्रचंड आवडतात. एक दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलिअर्स (एबीडी) आणि दुसरा न्यूझीलंडचा केन विलियम्सन.
एबीडीनं वन डे आणि टी-२० ची फलंदाजी नावीन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेत नेऊन ठेवली, तर केननं, कसोटी फलंदाजीची सर लेन हटन, सुनील गावसकर, राहुल द्रविड यांच्या परंपरेची विझत चाललेली ज्योत प्रज्वलित केली!
दोन वर्षांपूर्वी ‘लॉर्डस्’वर पाहिलेला केन माझ्या डोळ्यासमोर आहे. कुठलाही सुपरस्टार नसलेल्या संघाला तो स्वतःचं नेतृत्व आणि स्वतःच्या बॅटमधून प्रेमानं वाहणाऱ्या धावांच्या जिवावर अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. बरं, तो अंतिम सामना हरलाच नाही, सामना एकदा नव्हे तर, दोनदा बरोबरीत सुटला. तरी एका खुळ्या, काहीही लॉजिक नसलेल्या नियमामुळे इंग्लंडनं त्याच्या हातून विश्वचषक खेचून घेतला. दुर्भाग्यसुद्धा ‘आपण काय करून बसलो’ असं म्हणालं असेल त्या वेळी! पण केननं ते दुःख मनातच दाबून टाकलं. त्यातून निर्माण होणारी चीड, खदखद त्यानं आपल्या जिभेपर्यंत पोहोचू दिली नाही. ‘जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उस को भुलाता चला गया’ म्हणत त्यानं कसोटीच्या विश्व चॅम्पियन्सशिपच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. पुन्हा तो संघ घेऊन शिखरावर आला. शिखर पुन्हा इंग्लंडमध्ये होतं; पण या वेळी त्यानं नशिबावर काहीही सोपवलं नाही. स्वतःच्या नेतृत्वावर आणि बॅटच्या जोरावर त्यानं संघाला विजय मिळवून दिला.
नियतीलाही प्रायश्चित्त घेतल्याचं समाधान मिळालं असेल! पण तेव्हाही केन तसाच शांत, सुसंस्कृत होता...त्या पराभवात होता तसाच.
ढगाळ वातावरण आणि पावसाची अपेक्षित ये-जा या बाबी लक्षात घेऊन त्यानं पाच वेगवान गोलंदाज खेळवले. ते पहिलं योग्य दिशेनं त्यानं टाकलेलं पाऊल होतं. टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिल्यावर त्याच्या स्विंग गोलंदाजांना अपेक्षित यश सुरुवातीला मिळालं नाही; पण तरीही केन शांत होता. दुसऱ्या दिवशी त्यानं वेगवान गोलंदाजीमध्ये योग्य ते बदल केले आणि अक्षरशः प्रत्येक फलंदाजासाठी त्याच्या ताकदीनुसार किंवा कमकुवतपणानुसार त्यानं जाळं टाकलं. भारतीय फलंदाज त्यात अडकत गेले. रहाणे तर कमालीचा अडकला. न्यूझीलंडमध्ये वॅगनेरनं रहाणेला असंच वारंवार बाद केलं होतं; पण ठेच लागूनही रहाणे शहाणा झाला नाही.
क्षेत्ररक्षणात बदल करून योग्य जागी क्षेत्ररक्षक आणून ठेवल्यानंतर त्याच्या हाती थेट झेल जाणं यासारखी तृप्तता कर्णधाराला दुसरी नसेल. सन १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुराणीनं सोबर्सची विकेट काढल्यावर लॉईड बॅटिंगला आला आणि स्लिपमधला वाडेकर मिड ऑनला गेला. दुराणीला धक्का बसला. वाडेकरनं त्याला सांगितलं, ‘मी योग्य जागी उभा आहे.’ आणि अक्षरशः पुढच्या चेंडूवर लॉईडचा फटका थेट वाडेकरच्या पोटात आला. तिथं मॅच फिरली आणि त्याचबरोबर रबरसुद्धा. केनच्या बाबतीत हे दोनदा घडलं. दुसऱ्या डावात त्यानं शमीसाठी यष्टिरक्षकाच्या मागं अशा जागी एक क्षेत्ररक्षक ठेवला की तिथं सहसा कधी क्षेत्ररक्षक ठेवलाच जात नाही आणि त्याच्या डावपेचाला शमीच्या बॅटनं कुर्निसातच ठोकला! त्यानं त्याचा झेल त्या जागी उभ्या केलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अक्षरशः सोपवला.
आपल्या विराट कोहलीचा चेहरा हा त्याच्या मनातल्या भावनांचा आरसा आहे. त्याचा राग, त्याची निराशा, आनंद, आश्चर्य जे काही त्याच्या हृदयात उमटतं ते त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. त्याचा चेहराच बोलतो असं नाही, त्याचं शरीरही बोलत असतं.
विराटच्या उलट केन आहे. त्याचा चेहरा हा ओपेक काचेसारखा आहे. साऊदीनं स्लिपमध्ये पंतचा झेल सोडल्यानंतर मनातून केन नक्कीच निराश झाला असेल. तडफडला असेल. चिडला असेल. आणि असं जर झालं नसेल ना तर तो माणूसच नाही! मात्र, असा कुठलाही भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. एक किंचित निराशा चमकून गेली एवढंच. कारण, तो क्षण मॅच हातून निसटवणारा क्षण ठरू शकत होता आणि त्याची दोन्ही डावांतली फलंदाजी ही मूर्तिमंत कसोटी फलंदाजी होती.
परवाच मी गुंडाप्पा विश्वनाथची मुलाखत वाचली. ‘कुठला फलंदाज तुला सर्वोत्तम कसोटी फलंदाज वाटतो?’ असं त्याला विचारलं गेलं. अगदी माझ्या मनातलं उत्तर त्यानं दिलं. तो म्हणाला, ‘केन विलियम्सन.’ त्यानं कारणही दिलं. तो म्हणाला, ‘फ्रंट फूट असो किंवा बॅक फूट, फिरकी गोलंदाजी असो किंवा स्विंग वेगवान गोलंदाजी, ऑफ साईड असो किंवा ऑन असो...त्याच्या फलंदाजीत चुका शोधणं हे अत्यंत कठीण आहे. जितकी तांत्रिक बाजू दणकट, तितकंच त्याचं टेम्परामेंटसुद्धा घट्ट आहे.’
मॅच जिंकताना रन रेट आपल्या कह्यात राहील हे केननं पाहिलं; पण त्या रन रेटसाठी फाजील आक्रमकता दाखवली नाही. केन आणि त्याचा आधीचा कर्णधार ब्रॅंड्स मॅक्कलम यांच्यात हाच फरक आहे. केनला समोर त्याचं ध्येय दिसत होतं. त्याला तो ध्येयाकडे जाणारा रस्ता दिसत होता आणि त्या रस्त्यावरून कसं चालायचं हे त्यानं पक्कं ठरवलं होतं. त्याचप्रमाणे तो चालत गेला.
मॅचच्या शेवटच्या दिवशी फलंदाजीचं वातावरण हे सर्वात पोषक असलं तरी छोटे पाठलाग मुळीच सोपे नसतात. आश्विनला लागोपाठ दोन बळी मिळाल्यानंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ४४ होती आणि जवळपास १०० धावांचा पल्ला शिल्लक होता. त्याची मधली फळी अननुभवी आणि फारशी ताकदवान नाही, त्यामुळे जिंकण्यासाठी केननं शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं होतं. त्यानं अनुभवी रॉस टेलरला बरोबर घेऊन आपला दर्जा, आपला अनुभव आणि आपलं टेम्परामेन्ट पणाला लावलं. टेलर एरवी तसा आक्रमक फलंदाज आहे; पण समोर केनची फलंदाजी पाहून त्यानं केनचं टेम्परामेन्ट, केनचं शांत मन उसन घेतलं असावं!
न्यूझीलंड हा ५० लाखांचा देश आहे. त्यात क्रिकेट हा त्यांचा प्रमुख खेळ नाही. त्यातून उभारलेला संघ हा माणूस घेऊन लढतो. आणि समोर कोण होतं? तर दीडशे कोटींच्या देशातून उभारलेला संघ. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून मिरवणारा देश... सर्वात श्रीमंत आणि सुपरस्टार्सनी भरलेला म्हणून मिरवणारा संघ...आणि तरीही या सज्जन, सुसंस्कृत कर्णधारानं सर्वसाधारण कसोटी दर्जाच्या खेळाडूंना बरोबर घेऊन या बलाढ्य संघाला हरवलं. कदाचित भारताची पत गेली नाही; पण न्यूझीलंडची पत मात्र खूपच वर गेली.
(सदराचे लेखक हे ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)
No comments:
Post a Comment