विवाह सोहळ्याचा बदलता चेहरामोहरा
काळ कितीही पुढे गेला असला, तरी लग्नाचे प्रत्येक तरुण-तरुणीच्या मनात आणि आयुष्यात महत्त्व अजूनही अबाधित राहिले आहे. फक्त हा सोहळा साजरा करण्याच्या पद्धती बदलू लागल्या आहेत. सर्व नातेवाईकांच्या साक्षीने पार पडणाऱ्या या सोहळ्यात स्वत:चे 'मी'पण गमवू न देण्याकडे तरुण आता लक्ष देत आहेत.
लग्नसराईचा बदलता चेहरामोहरा
भारतात लग्न हा केवळ नवरा आणि नवरीच्या आयुष्यातील एक प्रसंग नसतो, तर त्याच्याशी घरातला प्रत्येकजण जोडला गेलेला असतो. त्यामुळेच घरामध्ये कोणाचे लग्न ठरले की, सर्वाचीच धावपळ सुरू होते. लग्नातील 'शादी का जोडा' किंवा लग्नाची साडी हा कोणत्याही काळातील स्त्रीसाठी महत्त्वाची बाब ठरत आली आहे. त्यामुळे आपल्या लग्नात आपण काय घालावे याचा ती खूप आधीपासून बारकाईने विचार करत असते. घरात तर मुलीच्या जन्मापासूनच तिच्या लग्नाच्या पोशाखाची तयारी सुरू होते. पंजाबी कुटुंबांमध्ये मुलीच्या जन्मासोबतच तिची आई तिच्या लग्नाची 'चुन्नरी' किंवा 'दुपट्टय़ा'वर कशिदाकाम करण्यास सुरुवात करायच्या. मुलीच्या वाढत्या वयानुसार खुलणाऱ्या त्या दुपट्टय़ामध्ये एका अर्थाने तिच्या माहेरच्या आठवणींची साक्ष असायची. तर काही घरांमध्ये मुलीला तिच्या आई किंवा आजीच्या लग्नातील साडी वारसाहक्काने दिली जाते.
काळानुसार पिढी बदलते. या बदलत्या पिढीनुसार त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचे दृष्टिकोन सर्व बदलत जातात. आजची तरुणी तिच्या भावी राजकुमाराची स्वप्ने पाहतेच, पण त्यावेळी त्याला भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहते. तिच्या लग्नाच्या पोशाखाबद्दलही ती चोखंदळ होत आहे. आईवडील, नातलग सांगतील ती पूर्व दिशा मानून लग्नाची खरेदी करण्यापेक्षा आजची तरुणी तिच्यावर खुलून दिसेल, त्यानुसार लग्नाच्या पोशाखाची निवड करते आहे. गरज पडल्यास एखाद्या स्टायलिस्टची नेमणूक करण्यातही तिला काहीच वावगं वाटत नाही. लग्नाच्या पोशाखातील या बदलत्या वाऱ्यांचा घेतलेला हा लेखाजोगा.
बॉलीवूडमुळे लग्नाच्या पोशाखांची व्याख्या बदलली. पूर्वी गावागावांमध्ये लग्नाचे पोशाख शिवणारे खास टेलर असायचे. गावात कोणाचंही लग्न असलं, तरी त्याच्याकडूनच नवरा-नवरीचे कपडे शिवून घेतले जायचे. पण भारतात चित्रपटसृष्टीचा प्रवेश झाला आणि त्यातून 'फॅशन डिझायनर्स'ची नवीन फळी जन्माला आली. या डिझायनर्सच्या फळीने कपडय़ांबाबत लोकांची धारणा बदलण्यास सुरुवात केली. नव्वदीच्या दशकातच तरुणींना गावातील या टेलरने शिवलेल्या लग्नाच्या साडीपेक्षा चित्रपटामध्ये माधुरीने नेसलेली साडी, श्रीदेवीचा सलवार कमीझ खुणावू लागला होता. लग्नामध्ये आपल्यालाही जर माधुरी किंवा श्रीदेवी दिसायचे असेल, तर त्यांच्यासारखेच कपडे घातले पाहिजेत, म्हणून त्यांनी त्यांच्या लग्नात चित्रपटातील नायिकांप्रमाणे कपडे शिवून घेण्यास सुरुवात केली. पुढे तर हे डिझायनर्सचे प्रस्थ अधिकच वाढले. चित्रपटातील करिनाचा घागरा पाहून तरुणी लग्नात 'मला मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला घागराच हवा' असा हट्ट करू लागल्या. रितू कुमार, नीता लुल्ला, रोहित बाल अशी डिझायनर्सची मोठी फळी यानिमित्ताने पुढे आली. आज चित्रपटांच्या लग्नाच्या कपडय़ांवर असलेला परिणाम काहीसा ओसरला असला, तरी डिझायनर्सची मक्तेदारी मात्र वाढली आहे. आजची तरुणी लग्नाच्या खरेदीसाठी डिझायनर किंवा स्टाइलिस्टला गाठतेच, पण त्यावेळी एखाद्या पडद्यावरील नायिकेची छबी डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा स्वत:वर काय चांगले दिसेल याचा विचार ती करते.
'दीपिकाच्या उंचीमुळे तिच्यावर खुलून दिसलेला घागरा एखाद वेळेस माझ्यावर चांगला दिसणार नाही', किंवा 'आलिया आणि माझा स्किन कलर सारखा नाही, त्यामुळे तिला सुट होणारा रंग माझ्यावर भावणार नाही', हा विचार त्या आता करू लागल्या आहेत. बॉलीवूडने लग्नमंडपामध्ये सुद्धा सर्व प्रांतांना, त्यांच्या रितीभातींना एकत्र आणलं. त्यामुळे मराठी घरातील मुलगी लग्नामध्ये शालूऐवजी घागरा चोलीची मागणी करू लागली, तर पंजाबी मुलीला सलवार कमीझपेक्षा साडी खुणवू लागली. बनारसी सिल्क, पैठणी अशा पारंपरिक साडय़ांची जागा नेट, शिफॉन, लेस फॅब्रिकच्या साडय़ांनी घेण्यामागेही बॉलीवूड जबाबदार होते.
तिच्यातील आत्मविश्वास तिच्या लग्नाच्या पेहरावातून झळकू लागला.
आजची तरुणी आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहे, स्वत:च्या शिक्षणापासून ते करिअर निवडण्यापर्यंतचे सर्व निर्णय ती स्वत: घेते. तिच्या या स्वतंत्र विचारांचे प्रतिबिंब तिच्या लग्नाच्या पोशाखामध्येही दिसून येत आहेत. त्यामुळे जर, साडीमध्ये नीट वावरता येत नसेल, तर त्याऐवजी घागरा, अनारकली घालण्यासही तिची हरकत नसते. 'पूर्वी आपल्याकडे 'सातच्या आत घरात' हा नियम मुलींसाठी घालून दिलेला असायचा, पण आता कामानिमित्त मुली रात्री एक-दोनपर्यंत बाहेर राहू लागल्या आहेत. अशा स्वतंत्र विचारसरणीच्या मुली लग्नाचा पोशाख निवडतानाही गंभीरपणे विचार करू लागल्या असल्याचे,' डिझायनर शेन पिकॉक सांगतो. या विचारसरणीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे लग्नासाठी घेतलेली साडी किंवा घागरा नंतरही वेगवेगळ्या पद्धतीने कशी वापरता येईल, याकडे तरुणी विचार करू लागल्या आहेत. लग्नाची साडी म्हणून वीस ते तीस हजार एका साडीमागे खर्च केल्यावर नंतर मात्र ती साडी कपाटात पडून राहते. पण हल्ली तरुणी आमच्याकडे येतानाच 'माझ्या लग्नातील लहेंगा मला मैत्रिणीच्या लग्नातही वेगळ्या पद्धतीने घालायचा आहे. त्यानुसार डिझाइन करून द्या' अशी मागणी करत असल्याचे स्टाइलिश निशा कुंदनानी सांगते. त्यामुळे लग्नात घातलेल्या अनारकली-लहेंगाचे नंतर अनारकली-चुडीदार आणि चोली-लहेंगा असे विभाजन करण्यास त्या पसंती देतात. साडी-लहेंगासुद्धा दुसऱ्या समारंभाला स्वतंत्र साडी किंवा चोली आणि लहेंगा अशापद्धतीने वापरता येईल, त्यादृष्टीने त्याचे डिझाइन केलेले असते. साडीवर किंवा लहेंगावर भरजडीत एम्ब्रॉयडरी केल्यास त्याचे वजन वाढते आणि ते घालण्यासही कठीण होते. त्यामुळे शक्यतो जॉर्जेट, शिफॉन अशा वजनाने हलक्या कापडाला आणि आटोपशीर एम्ब्रॉयडरीला तरुणी पसंती देत आहेत. कित्येकदा रिसेप्शनमध्ये वेस्टर्न गाऊनलाही पसंती देतात.
लग्नातून हद्दपार होणारा 'लाल' रंग
पूर्वी लग्नाची साडी किंवा सलवार-कमीझ लालच असली पाहिजे, असा नियम होता. लाल रंगाला आपल्याकडे शुभ मानले जाते. त्यामुळे लग्नात या रंगाचा आग्रह केला जायचा. तसेच मराठी लग्नातही पिवळ्या आणि हिरव्या साडीला महत्त्व दिले जाते. पण केवळ परंपरा म्हणून विशिष्ट रंग निवडण्यापेक्षा मुलीने तिच्यावर खुलून दिसणाऱ्या रंगाची निवड करण्याची गरज असल्याचे डिझायनर मीरा आणि मुझ्झफर अली सांगतात. परंपरेने चालून आलेला लाल रंग खरेतर प्रत्येक स्किनटोनवर खुलून दिसेल असे नाही. कित्येकांना तो साजेसा दिसत नाही. त्यामुळे त्याऐवजी तरुणी गुलाबी, पिवळा, सोनेरी, नारंगी रंगांना पसंती देऊ लागल्या आहेत. अर्थात यामागे लग्न कुठे आणि कधी आहे याचे गणितही सांभाळावे लागत असल्याचे निशा कुंदनानी सांगतात. दिवसा खुल्या मैदानात केलेल्या लग्नात फिकट रंग सुंदर दिसतात, तर रात्री रिसेप्शन पार्टीमध्ये गडद रंग छान दिसतात. अशुभ मानल्या जाणारा काळा, निळा, तपकिरी अशा गडद रंगांनीही लग्नाच्या पोशाखात स्थान मिळविले आहे. त्याचबरोबर एम्ब्रॉयडरीमुळे कपडय़ांचे वाढणारे वजन टाळण्यासाठी प्रिंट्सचा वापरही केला जात आहे.
लग्नाच्या कपडय़ांमध्ये शिरलेले कॉटन
'खरेतर आपल्याच भूमीवर बनणारे 'कॉटन' हे भारतीय हवामानाला साजेसे कापड आहे. लग्नासारख्या समारंभातून ते काहीसे दूर राहिले असले, तरी आता लोकांना त्याचे महत्त्व कळायला लागले असल्याचे,' डिझायनर सब्यासाची मुखर्जी सांगतात. लग्नाच्या हॉलमध्ये कित्येकदा गरम होत असते. त्यात शिफॉनसारखे कापड घालणे सोयीचे नसते. अशा वेळी कॉटनला पसंती दिली जाते. पण कॉटनला काहीशी मळकट छटा असते. त्यामुळे लग्नांमध्ये कॉटनच्या कपडय़ांचा वापर टाळला जायचा. परंतु आता मात्र सुटसुटीत आणि वजनाने हलक्या या कपडय़ांमध्ये वावरणे सोपे जात असल्याचे तरुणांचे मत आहे. मलमल, लिनिन कापडातील लहेंगा, घागरा संगीत, साखरपुडा यासारख्या समारंभांत घातला जातो.
दागिन्यांमधील विविधता
कपडय़ांप्रमाणेच दागिन्यांमध्येही घराण्यातील दागिन्यांचा शिरकाव पूर्वी असायचा. सोन्याच्या दागिन्यांचा प्रभाव लग्नात प्रामुख्याने दिसत असे. पण आता तरुणी दागिन्यातही प्रयोग करू लागल्याचे ज्वेलरी डिझायनर अंकिता तिवारी सांगतात. त्यामुळे सोन्यासोबतच प्लॅटिनम, कुंदन, अँटिक गोल्डचा वापरही होऊ लागला आहे. रंगीत खडेही दागिन्यांत मोठय़ा प्रमाणात वापरले जाऊ लागले आहेत. सोन्याचे दागिने कित्येकदा साडीसोबत मॅच होत नाहीत, अशा वेळी आर्टिफिशियल दागिन्यांनाही त्या पसंती देत असल्याचे अंकिता तिवारी सांगतात. दागिन्यांमध्ये पारंपरिक आकारांची जागा नवीन आकारांनी घेतली आहे.
नवरदेवाच्या पोशाखातील बदल
नवरदेवाच्या पोशाखांची यादी शेरवानी किंवा सूट इथपर्यंतच मर्यादित होती. पण आता त्यातही पर्याय निर्माण होऊ लागले आहेत. नानाप्रकारचे जॅकेट्स, जोधपुरी पँट्स, नेहरू सूट्स, धोती कुर्ता अशी विविधता त्यात पाहायला मिळते आहे. तसेच वेस्टर्न लूकमध्ये कोट्स, टक्सिडो, ब्लेझरचे पर्याय समोर येत आहेत. नवऱ्या मुलासाठीही त्याचे लग्न ही महत्त्वाची बाब असते, त्यामुळे त्याच्या पोशाखाकडे नीट लक्ष देण्याची गरज असते. तसेच वर आणि वधू दोघांचे पोशाख एकमेकांना साजेसे असतील याची खबरदारी घेणे महत्त्वाचे असल्याचे निशा कुंदनानी सांगतात. त्यामुळे दोघांच्या कपडय़ांमध्ये रंगाबाबतीत एक समान दुवा असण्याची गरज असते. काळा, निळा अशा ठरावीक रंगांच्या पलीकडे जाऊन विविध रंग आणि प्रिंटसबाबतीत प्रयोग करण्यास तरुणही उत्सुक असतात. काळाप्रमाणे मुलेही आता दागिने घालण्यास पसंती देत आहेत. मोत्यांच्या माळा, ब्रोच, सुंदर कफलिंग्स, कडा घालण्याकडे त्यांचा कल असतो.
लग्नामधील थीस्म आणि त्यानुसार ठरविले जाणारे कपडे
लग्न हा आयुष्यात एकदाच होणारा आणि महत्त्वाचा समारंभ असतो. त्यामुळे लग्नाच्या वीस वर्षांनंतरही अल्बम उघडून पाहिल्यावर काहीतरी उणीव राहिल्याची खंत मनात राहू नये, म्हणून तरुण विशेष काळजी घेत आहेत. लग्नामध्ये जुन्या परंपरा सांभाळताना त्यासोबत थोडीसी गंमत आणण्यासाठी विविध थीम्सचे आयोजन केले जाऊ लागले आहे. यामध्ये अगदी 'बीचपार्टी'पासून ते 'डिस्कोनाइट'चे आयोजन केले जाते. तसेच 'राजेशाही' स्टाइल सध्या लग्नांमध्ये प्रसिद्ध आहे. कित्येक जोडपी राजस्थान, गोवा अशा ठिकाणी जाऊन 'डेस्टिनेशन वेडिंग' करण्यात पसंती देतात. या सर्वासाठी लग्नापूर्वी दोन-तीन महिने अगोदरपासून स्टायलिस्ट, फोटोग्राफर, सेट डिझायनर यांच्याशी एकत्रितपणे चर्चा करून त्यानुसार लग्नाची थीम ठरवली जाते. त्याप्रमाणे अगदी वर- वधूपासून ते त्यांच्या आईवडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी कोणते कपडे घालावेत याची आखणी होती. घरातल्या मंडळींचे कपडे वर-वधूच्या कपडय़ाशी मिळतेजुळते असल्यास लग्नाच्या फोटोंमध्ये समतोल साधलेला दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या कपडय़ांची खरेदीही विचारपूर्वक केली जाते. लग्नाचे फोटोही त्या पद्धतीने काढले जातात. जोडप्याच्या भेटण्यापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतच्या प्रवासावर छोटा चित्रपट बनविण्यासही तरुण पसंती देऊ लागले आहेत.
काळ कितीही पुढे गेला असला, तरी लग्नाचे प्रत्येक तरुण-तरुणीच्या मनात आणि आयुष्यात महत्त्व अजूनही अबाधित राहिले आहे. फक्त हा सोहळा साजरा करण्याच्या पद्धती बदलू लागल्या आहेत. सर्व नातेवाईकांच्या साक्षीने पार पडणाऱ्या या सोहळ्यात स्वत:चे 'मी'पण गमवू न देण्याकडे तरुण आता लक्ष देत आहेत.
No comments:
Post a Comment